चंपक मैदान परिसरातील घटना; बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद
रत्नागिरी : Ratnagiri Death Case प्रकरणात रत्नागिरी तालुक्यातील चंपक मैदान परिसरातील आंब्याच्या बागेत ६७ वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. ही घटना ५ जुलै २०२६ रोजी उघडकीस आली असून, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात बीएनएसएस (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीची ओळख सियाराम अमरसिंग देवांगण (वय ६७) अशी झाली असून, ते चंपक मैदान येथील आंब्याच्या बागेत वास्तव्यास होते. त्यांचे मूळ गाव छत्तीसगड राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी मयत यांचा मुलगा किसन सियाराम देवांगण यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाराम देवांगण हे गेल्या पाच ते सात वर्षांपासून कुटुंबापासून विभक्त राहत होते. मात्र, मुलगा आणि इतर कुटुंबीय त्यांची अधूनमधून भेट घेत असत.
५ जुलै रोजी मयत यांचा दुसरा मुलगा विकास देवांगण हे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या ठिकाणी गेले असता, सियाराम देवांगण हे जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यावेळी त्यांचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५८/२०२६ नोंदविण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.














