Lonavala Rain: मुसळधार पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू!

जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्बंध

पुणे:

मुंबईसह पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विशेषतः लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात पावसाने रौद्ररूप धारण केले असून तेथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यटकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ च्या कलम १६३ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. ६ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ३१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत हे निर्बंध अमलात राहतील. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कलम १६३ म्हणजे पर्यटनावर पूर्ण बंदी नसून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले हे निर्बंध आहेत.

धोकादायक पर्यटनस्थळांवर सेल्फी, रिल्स आणि व्हिडिओग्राफीला मनाई

लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे जसे की भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, पवना धरण, एकवीरा देवी मंदिर परिसर, तसेच लोहगड, विसापूर, तिकोणा आणि तुंग या किल्ल्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे या भागात अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे. त्यामुळे आता पर्यटकांना मुख्य धबधब्यांच्या ठिकाणी किंवा इतर कोणत्याही धोकादायक पॉईंटवर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशा संवेदनशील ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे, व्हिडिओग्राफी करणे किंवा सोशल मीडियासाठी रिल्स बनवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

पर्यटकांवर घालण्यात आलेले प्रमुख निर्बंध:

  • कालावधी: ६ जुलै मध्यरात्रीपासून ३१ जुलै सकाळी ६ वाजेपर्यंत कलम १६३ लागू राहील.
  • जलाशयांमध्ये प्रवेशबंदी: धबधबे, ओढे, नदी आणि धरणाच्या पाण्यात उतरण्यास पर्यटकांना पूर्णपणे बंदी आहे.
  • शूटिंगला मनाई: धोकादायक कड्यांवर उभे राहून सेल्फी घेणे किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
  • हुल्लडबाजीवर कारवाई: मद्यपान करणे, ध्वनीप्रदूषण (डीजे/स्पीकर्स), आणि पर्यटनस्थळांवर कचरा टाकण्यावर बंदी असेल.
  • सुरक्षा व शिस्त: महिलांची छेडछाड काढणारे आणि बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
  • वाहतुकीचे नियम: धरण आणि नदीकाठच्या परिसरात चारचाकी आणि सहाचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

लोणावळा-कर्जत घाट विभागातील रेल्वे वाहतूक विस्कळीत; युद्धपातळीवर काम सुरू

दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे लोणावळा-कर्जत दक्षिण-पूर्व घाट विभागातील मंकी हिल आणि खंडाळा स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रेल्वे रुळांवर आलेला मातीचा ढिगारा, मोठे दगड आणि खडक हटविण्याचे काम रेल्वे प्रशासनाच्या अभियांत्रिकी विभाग आणि कर्मचाऱ्यांमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत असले, तरी सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून रेल्वे मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 06-07-2026