MSEDCL Power Outage: राजापूर तालुक्याला महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका; उपसभापती अभिजित गुरव यांचा ताळे ठोकण्याचा इशारा

वारंवार दीर्घकाळ वीज खंडित; कोदवली-नेरकेवाडी परिसर तब्बल साडेअठरा तास अंधारात


राजापूर:

MSEDCL Power Outage च्या समस्येने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याला पुरते वेढले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना सोसावा लागत असून, शहरासह ग्रामीण भागात वारंवार आणि दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाळ्यापूर्वीची देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत आणि प्रभावीपणे न केल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा २० ते २४ तास खंडित होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस व तालुका पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केला आहे. या कारभारात तातडीने सुधारणा न झाल्यास महावितरणच्या कार्यालयालाच ताळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कोदवली-नेरकेवाडी परिसर तब्बल साडेअठरा तास अंधारात
महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचे अत्यंत विदारक चित्र शनिवारी पाहायला मिळाले. शनिवारी सायंकाळी पाच वाजता कोदवली व नेरकेवाडी परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. या संदर्भात उपअभियंता जमीर तांबोळी यांच्याशी तीनवेळा दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याची वेळेत दखल घेतली गेली नाही. रात्री उशिरापर्यंत बिघाड शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कोदवली येथे वीजवाहिनीवर झाड पडल्यामुळे रात्री वीजपुरवठा सुरू होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अखेर रविवारी सकाळी साडेअकरा वाजता, म्हणजेच तब्बल साडेअठरा तासांनंतर या परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला.

उन्हाळ्यातील देखभालीचा फायदा शून्य; नागरिक अडचणीत
उपसभापती अभिजित गुरव यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. उन्हाळ्यात दर सोमवारी देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत होता, मात्र त्याचा प्रत्यक्ष फायदा पावसाळ्यात का दिसून येत नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पावसाळा सुरू होताच महावितरणच्या कारभारातील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागात तासभरही सलग वीजपुरवठा सुरक्षित राहत नसल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

निधी मिळूनही कामे अपूर्ण; उपकरणांच्या नुकसानीची जबाबदारी कोणाची?
शासनाकडून महावितरणला विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. असे असतानाही जीर्ण वीजवाहिन्या बदलणे, वीज खांबांचे नूतनीकरण करणे तसेच वीजवाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या वेळेत हटवणे ही कामे वेळेत का केली जात नाहीत, असा जाब गुरव यांनी विचारला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात अनेक ठिकाणी १० ते २० तास वीजपुरवठा खंडित राहत असून वारंवार लाईट ट्रिप होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान होत असून या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“वेळेत वीजबिल न भरल्यास तातडीने वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणने सुरळीत वीजपुरवठा करण्याची जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने पार पाडावी. भविष्यात ही परिस्थिती अशीच राहिली, तर जनतेच्या रोषाचा उद्रेक होईल आणि महावितरण कार्यालयावर धडक देऊन कार्यालयाला ताळे ठोकले जाईल.”

— अभिजित गुरव, उपसभापती, राजापूर पंचायत समिती

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 08-07-2026