प्रत्युत्तरादाखल इराणचा अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ला
वॉशिंग्टन/तेहरान:
इराण-अमेरिका युद्धात (Iran War Live Update) आज (८ जुलै) पहाटे एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक घडामोड घडली आहे. शस्त्रसंधीच्या काळात अमेरिकेने थेट इराणच्या भूप्रदेशावर भीषण हवाई हल्ला केला. ‘यूएस सेंट्रल कमांड’ने (सेंटकॉम) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अमेरिकन वायूसेनेने अचूक मारा करणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या साहाय्याने इराणमधील ८० हून अधिक लष्करी ठिकाणांना एकाच वेळी लक्ष्य केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या तीन व्यापारी जहाजांवर इराणकडून हल्ले करण्यात आले होते, याच हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वॉशिंग्टनने थेट इराणवर हा मोठा लष्करी प्रहार केला आहे.
अमेरिकेने केलेल्या या हाय-टेक हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली (Air Defense Systems), कमांड आणि कंट्रोल सेंटर्स, किनारी रडार यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन प्रक्षेपण स्थळे आणि ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’च्या (IRGC) ६० हून अधिक लष्करी बोटींचा पूर्णपणे चक्काचूर करण्यात आला आहे. इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर सिरिक, केशम बेट आणि बंदर अब्बास या प्रमुख भागांमध्ये लागोपाठ अनेक शक्तिशाली स्फोट झाले असून अनेक लष्करी तळांना मोठी आग लागली आहे.
प्रत्युत्तरादाखल इराणचा अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ला
अमेरिकेच्या या आक्रमक कारवाईनंतर युद्ध आणखी चिघळले असून इराणनेही थेट प्रतिहल्ला चढवला आहे. इराणी लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी बहरीन आणि कुवेत येथे असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत ८५ हून अधिक ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. इराणच्या या प्रतिहल्ल्यानंतर संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले असून बहरीनमध्ये बुधवारी सलग तिसऱ्यांदा हवाई हल्ल्याचे चेतावणी सायरन वाजले आहेत. बहरीनच्या गृह मंत्रालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि तात्काळ जवळच्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.
अयातुल्ला खामेनी यांच्या अंत्ययात्रेदरम्यान आंतरराष्ट्रीय तणाव
एकीकडे युद्धाचा भडका उडालेला असतानाच, दुसरीकडे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची अंत्ययात्रा इराकच्या नजफ शहरात सुरू आहे. इराणमध्ये अनेक दिवस चाललेल्या अंत्ययात्रा आणि धार्मिक विधींनंतर, खामेनी यांचे पार्थिव एका विशेष विमानाने मंगळवारी रात्री इराकच्या नजफमध्ये आणण्यात आले. अंत्ययात्रेच्या मार्गावर लाखो भाविक आणि समर्थकांची मोठी गर्दी उसळली आहे. तेहरान आणि कोम शहरात झालेल्या अंत्यविधी दरम्यान लाखो लोकांनी सूडाचे प्रतीक म्हणून खामेनी यांच्या शवपेटीवर लाल कापड अर्पण करून अमेरिकेविरुद्ध संताप व्यक्त केला होता.
गेल्या २४ तासांतील ४ अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी:
- होर्मुझमध्ये ३ टँकर्सवर हल्ला: खामेनी यांच्या अंत्यविधीचे विधी सुरू असतानाच, इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत ३ व्यापारी टँकर्सना लक्ष्य केले. यामध्ये कतारच्या एका जहाजाचाही समावेश आहे. निर्धारित सागरी मार्गांचे पालन न केल्यास सुरक्षा व्यवस्था अनियंत्रित होईल, असा कडक इशारा इराणने दिला आहे.
- कतारचा इराणवर तीव्र आक्षेप: कतारने होर्मुझ सामुद्रधुनीतील आपल्या जहाजावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या बेकायदेशीर कृत्यासाठी कतारने इराणला पूर्णपणे जबाबदार धरले असून, इराणी हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
- इराणची अमेरिकेला तंबी: इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला सुनावले असून, धमक्यांच्या आणि दबावाच्या वातावरणात कोणताही नवा करार होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. शांतता हवी असल्यास सर्वप्रथम अमेरिकेने आपल्या जुन्या करारांचा आदर केला पाहिजे, असे अराघची म्हणाले.
- कोममध्ये जनसागर: तेहरानमधील अंत्ययात्रेनंतर सलग दुसऱ्या दिवशी कोम शहरात खामेनी यांच्या अंतिम दर्शनासाठी लाखो लोकांचा जनसागर उसळला होता. या गर्दीमुळे आखातातील राजकीय आणि लष्करी वातावरण प्रचंड तापले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 08-07-2026














