पदोन्नती, संचमान्यता आणि ‘टीईटी’ नियमांवरून संघटना आक्रमक
रत्नागिरी: Teachers Strike Maharashtra म्हणजेच शिक्षक अभियोग्यता परीक्षेमुळे राज्यामध्ये निर्माण झालेली सेवाविषयक अस्थिरता, शिक्षकांची हिरावलेली पदोन्नतीची संधी, १५ मार्च २०२४ चे संचमान्यता धोरण आणि ‘बीएलओ’ (BLO) नियुक्ती संदर्भातील राज्य शासनाचे दुर्लक्ष, या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी एकत्रित येत गुरुवार, दिनांक ९ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या उदासीन धोरणाचा तीव्र निषेध केला जाणार आहे.
आझाद मैदान आणि जिल्हा पातळीवर निदर्शने
आंदोलनादरम्यान मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर राज्यस्तरीय आंदोलन केले जाईल. यासोबतच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षकांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती शिक्षक समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिलीप रामचंद्र महाडिक यांनी दिली आहे. या व्यापक आंदोलनासंदर्भात शिक्षक संघटनांच्या संयुक्त समितीने गेल्या ३० जून रोजीच राज्य शासनाला रीतसर नोटीस बजावली होती.
अनेक समविचारी संघटना एकत्र; आंदोलनाची व्याप्ती मोठी
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील अनेक प्रमुख शिक्षक संघटना एकत्र आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना
- शिक्षक संघटना समन्वय समिती
- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
- महाराष्ट्र टीईटी / सीटीईटी उत्तीर्ण शिक्षक कृती समिती
- महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षक संघटना
- शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, प्रहार संघटना, प्रोटान संघटना
या सर्व समविचारी शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हे राज्यव्यापी आंदोलन छेडले जात आहे.
काय आहेत शिक्षकांच्या प्रमुख मागण्या?
शिक्षक संघटनांनी शासनासमोर ठेवलेल्या मागण्या अत्यंत कळीच्या असून, त्या खालीलप्रमाणे आहेत:
१. पदोन्नती प्रक्रियेला स्थगिती: शिक्षण संचालकांनी राज्यात सुरू केलेली विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने थांबवण्यात यावी आणि ते पत्र अधिक्रमित करण्यात यावे. ज्या जिल्ह्यांमध्ये या पत्रामुळे पदोन्नती प्रक्रिया राबवली गेली आहे, ती तात्काळ रद्द करण्यात यावी.
२. टीईटी (TET) नियमात बदल: तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा सरकारच्या धर्तीवर, २०१० पूर्वी सेवेत रुजू झालेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांचे वय, शारीरिक व्याधी आणि प्रदीर्घ सेवा लक्षात घेऊन त्यांना ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या नियमातून तातडीने सवलत देण्यात यावी.
३. नैसर्गिक न्यायाने पदोन्नती: सर्वोच्च न्यायालयाने पात्रता धारण करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. या निर्णयाच्या अधीन राहून ज्या सेवाज्येष्ठ शिक्षकांनी इतर सर्व शैक्षणिक अटी पूर्ण केल्या आहेत, त्यांना पदोन्नतीची तात्काळ संधी मिळणे आवश्यक आहे.
४. संचमान्यता धोरण रद्द करणे: विद्यार्थी व शाळाविरोधी असलेले १५ मार्च २०२४ चे संचमान्यता धोरण गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या) शाळा वाचवण्यासाठी तातडीने रद्द करण्यात यावे.
रत्नागिरीतील बैठकीला पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी रत्नागिरीत झालेल्या बैठकीला शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस संतोष पावणे, कोकण विभागीय अध्यक्ष रूपेश जाधव, कार्याध्यक्ष सीताराम कोसंबे, राज्य प्रतिनिधी विलास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मनोज म्हस्के आणि शरद भोसले उपस्थित होते. याशिवाय जिल्हा सल्लागार उकस्कर, तज्ज्ञ संचालक सचिन चांदिवडे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, तालुका सरचिटणीस आणि जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 09-07-2026














