रत्नागिरी रेल्वे स्थानक छताची दुर्घटना; मनसे आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

अमृत भारत योजना अंतर्गत ४० कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसर आणि रिक्षा स्टँड जवळील सुशोभीकरण केलेल्या छताचा काही भाग कोसळल्याची गंभीर घटना ५ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री ११ वाजता घडली. या पार्श्वभूमीवर, बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेतली. या अपघाताला जबाबदार असणारे कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना सोपवले.

‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली झालेल्या या कामातील छताचा मोठा भाग अचानक कोसळला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकल्पाच्या अधिकृत उद्घाटनापूर्वीही अशीच छत कोसळल्याची घटना घडली होती. एकाच कामात दुसऱ्यांदा अशी दुर्घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संपूर्ण कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रविवारच्या मध्यरात्री झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी कामाचा असा निकृष्ट दर्जा राहिल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. मनसेने निवेदनात म्हटले आहे की, या संपूर्ण सुशोभीकरण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करून तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करण्यात यावे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ काळया यादीत (Blacklist) टाकण्यात यावे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या संवेदनशील प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे आश्वासन मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहे. शासकीय यंत्रणांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे, जर प्रशासनाने या निकृष्ट कामाची योग्य चौकशी केली नाही आणि संबंधितांवर ठोस कारवाई झाली नाही, तर मनसे स्टाईलने तीव्र उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्यासोबत चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, तेजस नागवेकर, सुजित घाणेकर यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 09-07-2026