जाकादेवी: Nivli Jaigarh Highway | रत्नागिरी तालुक्यातील निवळी-जयगड महामार्गावर असलेल्या तरवळ येथील खडेकर यांच्या घरासमोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या महामार्गाची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली असून, तरवळ येथील हे खड्डे अत्यंत जीवघेणे ठरत आहेत. या खड्ड्यांमुळे कधीही मोठा अपघात घडण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात तीच परिस्थिती; वाहनचालकांना करावी लागतेय कसरत
निवळी-जयगड महामार्गावरील तरवळ येथील भागात दरवर्षी पावसाळ्यात मोठे खड्डे पडत असून यंदाही परिस्थिती बिकट झाली आहे. या महत्त्वाच्या मार्गावरून दररोज शेकडो अवजड वाहने, मालवाहू ट्रक आणि प्रवासी वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने आणि खड्डे चुकवताना वाहनांचा तोल जाण्याची शक्यता वाढल्याने वाहनचालकांना येथून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
रात्रीच्या वेळी धोका अधिक; नागरिक सतत भीतीची छायेखाली
रस्त्यावरील हे मोठमोठे खड्डे चुकवताना वाहनचालकांचे नियंत्रण सुटून रात्रीच्या वेळी भीषण अपघात होण्याची शक्यता अधिक तीव्र झाली आहे. केवळ वाहनचालकच नव्हे, तर रस्त्यालगत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनाही या परिस्थितीमुळे सतत भीतीची छायेखाली राहावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर आता नागरिकांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का?’ ग्रामस्थांचा संतप्त सवाल
“रस्त्यावर एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल आता तरवळ येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दरवर्षी केवळ खड्ड्यांची वरवरची मलमपट्टी न करता, या ठिकाणी कायमस्वरूपी काँक्रिटचा दर्जेदार रस्ता उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे. संभाव्य जीवितहानी आणि मोठे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या धोकादायक खड्ड्यांची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 10-07-2026














