पोलिसांत गुन्हा नोंद; कौटुंबिक छळासह जादूटोणा विरोधी कायद्यान्वये कारवाई
ठाणे:
‘Vinayak Raut News’ | शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि पत्नी शामल राऊत यांच्यासह सात जणांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. घोडबंदर येथील चितळसर मानपाडा भागात वास्तव्यास असलेल्या विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी १० जून रोजी ही तक्रार दिली होती. या तक्रारीत त्यांनी कौटुंबिक छळ, मारहाण आणि मानसिक त्रासासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ अघोरी कृत्यांचे गंभीर आरोप केले आहेत. या धक्कादायक प्रकरणावर आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून मोठ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
‘पतीची असमर्थता लपवण्यासाठी ५ वर्षे अघोरी कृत्य केले’; गिरीजा राऊत यांचा माध्यमांसमोर खुलासा
गिरीजा राऊत यांनी माध्यमांसमोर येत आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगितली. २०१७ मध्ये विवाह झाल्यानंतर पती गितेश यांनी वैवाहिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली, असे त्यांनी म्हटले. पती शारीरिक संबंधांसाठी असमर्थ आहे ही गोष्ट लपवण्यासाठी सासरच्या लोकांनी सप्टेंबर २०१८ ते २०२२ या काळात कोकण आणि सिंधुदुर्ग पट्ट्यात नेऊन वेगवेगळ्या बाबांमार्फत अघोरी इलाज केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. यादरम्यान जिवंत कोंबडा अंगावरून उतरवणे, कणकेच्या बाहुल्या, डोक्याचे केस ओढणे, तसेच कच्चे गोमूत्र, हळद आणि अगरबत्तीची उदी तीर्थ म्हणून पाजणे असे विचित्र प्रकार करून आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे गिरीजा यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
राजकीय प्रतिमेचा दबाव आणि झोपडपट्टीतील घराची फसवणूक
गिरीजा यांनी पुढे आरोप केला की, विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नी व मुलीसोबत दुसऱ्या घरात राहतात, तर आपल्याला लग्नाच्या वेळी मुंबईत बंगला असल्याचे खोटे सांगून प्रत्यक्षात झोपडपट्टीतील घरात ठेवण्यात आले. विनायक राऊत हे वर्षातून फक्त नवरात्रीत घट बसताना आणि दसऱ्याला घरात यायचे व फोनवरून जबाबदाऱ्या घेण्यास सांगायचे, मात्र त्यांनी कधीही मुलगा किंवा पत्नीला समज दिली नाही. उलट पती गितेश याने, ‘वडिलांनी निवडणुकीत दोन कोटी रुपये लावले आहेत, तुझ्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला तर बघून घेईन,’ अशी धमकी देत मारहाण व मेंटल ट्रॉमा दिला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
‘१० कोटी आणि गाडीची मागणी पूर्ण न झाल्याने खोटी तक्रार’; विनायक राऊतांचे खंडन
दुसरीकडे, माजी खासदार विनायक राऊत यांनी स्वतःवर आणि कुटुंबावर झालेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. राऊत यांनी स्पष्ट केले की, गितेश आणि गिरीजा गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत नसून सध्या न्यायालयात त्यांची घटस्फोटाची केस सुरू आहे. २०१८ मधील कथित घटनांवर २०२६ मध्ये तक्रार करणे संशयास्पद आहे. गिरीजा यांनी कायदेशीर नोटिशीद्वारे दरमहा ५ लाख रुपये खर्च, १० कोटी रुपये नुकसानभरपाई, ५ रूमचे घर आणि ऑटोमॅटिक गाडी मागितली होती. या अवाजवी मागण्या पूर्ण न झाल्यानेच तिने सूडबुद्धीने ही खोटी तक्रार दाखल केली असून, आम्ही कोणत्याही अघोरी पंथाचे नसून न्यायालयात याविरोधात दाद मागितली आहे, असे विनायक राऊत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 10-07-2026














