शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची मुंबईत मोठी घोषणा; शिक्षकांचे आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित
मुंबई (माखजन):
‘Maharashtra Teachers Salary Update’ | महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अंशतः अनुदानित शिक्षकांना मार्च २०२७ चा पगार वाढीव २०% टप्प्याने थेट त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची अधिकृत घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे केली आहे. या सकारात्मक घोषणेनंतर, गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक समन्वय संघाच्या बॅनरखाली सुरू असलेले धरणे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे.
३० दिवसांच्या धरणे आंदोलनाला यश; अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मंजूर होणार
राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा, तसेच ३० दिवसांच्या आत त्रुटी पूर्ण करणाऱ्या संबंधित शाळांना मानीव टप्पा देऊन समान टप्प्यावर आणावे, या प्रमुख मागण्यांसाठी २२ जूनपासून आझाद मैदानावर दिवस-रात्र आंदोलन सुरू होते. या वाढीव २०% मानधनासाठी लागणारी आवश्यक रक्कम आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केली जाईल, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनाची ताकद वाढवण्यासाठी शिक्षक समन्वय संघाने खासदार आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती, तर आमदार रोहित पवार, शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांनी प्रत्यक्ष आझाद मैदानात येऊन पाठिंबा दिला होता.
वरिष्ठ पातळीवरील बैठकीत झाला अंतिम निर्णय; १५ हजार शिक्षकांना दिलासा
आझाद मैदानावर सुमारे १५ हजार शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी १० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी, अर्थ खात्याचे अधिकारी, शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार यांच्यात एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या वादळी चर्चेअंती अंशतः अनुदानित शिक्षकांना १ मार्च २०२७ पासून वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.
३१ मार्चपूर्वी वाढीव पगार खात्यात जमा होणार; मंत्र्यांचे आश्वासन
संकटमोचक म्हणून भूमिका बजावणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आझाद मैदानात येत आंदोलकांसमोर हा निर्णय घोषित केला. शिक्षकांच्या खात्यात वाढीव टप्प्याचा पगार ३१ मार्चपूर्वी जमा केला जाईल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली. या टप्पा वाढीसाठी शिक्षकांना पुन्हा कोणतेही आंदोलन करावे लागणार नाही, अशी हमी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित शिक्षकांना दिली असून इतर मागण्यांवरही लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. या यशस्वी तोडग्यानंतर शिक्षक समन्वयकांकडून महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 10-07-2026














