आजअखेर १८ हजार १८१ हेक्टर क्षेत्रावर भात लावणी पूर्ण
रत्नागिरी:
Ratnagiri Paddy Cultivation Delay | रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने भात लावण्यांचे काम मोठ्या प्रमाणावर खोळंबले आहे. जून महिन्यातील पावसाची कमतरता जुलैच्या सुरुवातीला भरून निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात भात लावणीला सुरुवात केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतेत पडला असून, कडक ऊन आणि पाण्याच्या अभावामुळे भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत.
जूनचा बॅकलॉग भरून काढला, पण आता पुन्हा चिंता
जिल्ह्यात जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. परंतु, जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जून महिन्याची कसर भरून निघाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतांमध्ये भात पुनर्लागवडीच्या कामांना वेग दिला. जिल्हा कृषी विभागाच्या अहवालानुसार, आजअखेर जिल्ह्यात एकूण १८,१८१ हेक्टर क्षेत्रावर भात लावणी पूर्ण झाली आहे. मात्र, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने तापमान वाढले असून पिकांचे शेंडे करपू लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची मुबलक सोय आहे, त्यांनी कशाबशा लावण्या सुरू ठेवल्या असल्या, तरी बहुतांश कोरडवाहू शेतकऱ्यांनी कामे थांबवली आहेत.
तालुकानिहाय भात पुनर्लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये):
जिल्ह्यात झालेल्या तालुकानिहाय भात लावणीची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
तालुका भात पुनर्लागवड क्षेत्र (हेक्टर)
रत्नागिरी २,४३१
लांजा २,१००
राजापूर ३,६४०
संगमेश्वर २,५३०
गुहागर १,२३०
चिपळूण ३,७००
खेड ६०५
दापोली १,२५०
मंडणगड २७५
एकूण १८,१८१
शेतकऱ्यांनी पॅनिक होऊ नये: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
या सद्यस्थितीवर बोलताना रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. “जून आणि जुलै महिन्यातील सुरुवातीच्या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील रोपवाटिकेची पुनर्लागवड यशस्वी झाली आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील भात लावणी सुरू आहे. हवामान अंदाजानुसार, १७ जुलैच्या पुढे जिल्ह्यात पुन्हा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पुढील चार दिवस शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. पाऊस पडताच पिके पुन्हा पूर्ववत होतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात पॅनिक न होता दोन दिवस थांबावे आणि पाऊस सुरू झाल्यावरच पुढील लावणी करावी,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 15-07-2026














