सीमाशुल्क विभागाकडून कारवाई
खेड:
Lote Ketamine Case | खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) एका नामांकित कंपनीतून मुदतबाह्य निर्यात परवान्याचा गैरवापर करून तब्बल २०० किलो ‘केटामाइन हायड्रोक्लोराइड’ हा नियंत्रित अमली पदार्थ दक्षिण कोरियाला बेकायदेशीररित्या पाठवण्याचा आंतरराष्ट्रीय तस्करीचा प्रयत्न सीमाशुल्क विभागाने उधळून लावला आहे. या गंभीर प्रकरणी संबंधित कंपनीच्या महाव्यवस्थापकाला (जनरल मॅनेजर) मुंबई येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १७ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात कंपनी महाव्यवस्थापकासह एका सीमाशुल्क दलालालाही (कस्टम ब्रोकर) अटक करण्यात आली असून, सीमाशुल्क विभागाच्या विशेष तपास आणि गुप्तचर शाखेकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
मुदत संपलेल्या परवान्याद्वारे आंतरराष्ट्रीय तस्कररीचा डाव
या खळबळजनक प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, लोटे एमआयडीसीतील संबंधित कंपनीमध्ये महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत श्रीधरन याने एका सीमाशुल्क दलालाच्या साहाय्याने हा कट रचला होता. ‘सेंट्रल ब्युरो ऑफ नारकोटिक्स’कडून कंपनीला मिळालेल्या केटामाइनच्या निर्यात परवान्याची मुदत आधीच संपलेली होती. तरीही, संशयित आरोपींनी याच मुदतबाह्य परवान्याचा (Expired Export License) वापर करून २०० किलो केटामाइन हायड्रोक्लोराइड या सायकोट्रॉपिक पदार्थाची मोठी खेप दक्षिण कोरियाला निर्यात करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला.
प्राथमिक चौकशीनंतर न्यायालयाने सुनावली कोठडी
सीमाशुल्क विभागाच्या (Customs Department) विशेष तपास व गुप्तचर शाखेला या संशयास्पद निर्यातीची आगाऊ माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने तातडीने कारवाई करत हा माल जप्त केला. प्राथमिक चौकशीमध्ये निर्यात व्यवहारात वापरण्यात आलेले प्राधिकृत पत्र पूर्णपणे मुदतबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सीमाशुल्क विभागाने महाव्यवस्थापक श्रीकांत श्रीधरन आणि संबंधित दलालाला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपींना १७ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत तपास सुरू; कंपनीकडून अंतर्गत पुनरावलोकन
आवश्यक आणि वैध मंजुरीशिवाय अशा नियंत्रित अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करण्याचा प्रयत्न केल्यामुळे, या प्रकरणाचा तपास एनडीपीएस (NDPS) कायदा, १९८५ अंतर्गत कथित प्रक्रियात्मक त्रुटींच्या अनुषंगाने अत्यंत सखोलपणे सुरू आहे. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या प्रकरणाची गंभीर दखल कंपनी प्रशासनानेही घेतली आहे. कंपनी स्तरावर या संपूर्ण प्रकरणाचे अंतर्गत पुनरावलोकन (Internal Review) सुरू करण्यात आल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे. तसेच या प्रकरणी योग्य तो कायदेशीर सल्ला घेतला जात असून, तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या आंतरराष्ट्रीय रॅकेटची पाळेमुळे कुठेपर्यंत पसरली आहेत, याचा पुढील तपास सीमाशुल्क विभाग करत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 15-07-2026














