Ratnagiri Rain Update: रत्नागिरी जिल्ह्यात आषाढ सरींची हजेरी; २४ तासांत ९६.७० मिमी पावसाची नोंद

विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन: शेतकरी अन् नागरिकांना दिलासा, खेड आणि दापोलीत सर्वाधिक पाऊस

बातमी

Ratnagiri Rain Update: रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आषाढीच्या पहिल्या दिवशी, बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण ९६.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी ११ मिलीमीटर पाऊस पडला आहे. खेड, मंडणगड, दापोली, गुहागर, चिपळूण, लांझा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळाली.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने अचानक दडी मारली होती. या खंडामुळे रत्नागिरी शहर आणि जिल्हाभरात तापमानासोबतच उकाडा कमालीचा वाढला होता. पावसाअभावी रखडलेली भात लावणीही ठप्प झाली होती. मात्र, बुधवारी सायंकाळी आणि मध्यरात्री जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ratnagiri Rain Update: कोणत्या तालुक्यात किती पाऊस?

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत विविध तालुक्यांमध्ये पावसाची वेगवेगळ्या प्रमाणात नोंद झाली आहे. यामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक १९ मिमी, तर मंडणगडमध्ये १६.८० मिमी आणि दापोलीत १६.३० मिमी पाऊस पडला आहे. कोकणातील या प्रमुख तालुक्यांमध्ये पावसाचा जोर इतर भागांच्या तुलनेत अधिक होता.

दुसरीकडे, गुहागर तालुक्यात १३.५० मिमी आणि चिपळूणमध्ये १२.१० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. संगमेश्वर तालुक्यात ४.८० मिमी, लांझा येथे ४.८० मिमी, रत्नागिरी शहरासह परिसरात ४.५० मिमी आणि राजापूर तालुक्यात ४.१० मिमी इतका पाऊस पडला आहे.

भात लावणीला गती येण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा

बुधवारी आणि गुरुवारी झालेला हा पाऊस काही भागात तुरळक स्वरूपाचा होता. गुरुवारी सकाळी लांझासह काही तालुक्यांत थोड्या सरी कोसळल्या, मात्र शहर आणि अन्य भागांत दिवसभर ऊन, वारा आणि पावसाचा खेळ सुरू होता. प्रखर उन्हामुळे वातावरणातील प्रचंड उकाडा अजूनही जाणवत आहे.

कृषी क्षेत्राचा विचार करता, या पावसामुळे थांबलेल्या भात लावणीच्या कामांना काहीशी गती मिळणार असली, तरी शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या आणि दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानंतरच भात लावणीला पूर्ण वेग येईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३१.८०% पाऊस झाला असून, एकूण सरासरी १,३१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 17-07-2026