‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रमांतर्गत २०० नारळ रोपांचे वाटप; ४० वृक्षमित्रांचा सन्मान
Ratnagiri Green Initiative: रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत ९०० झाडांची यशस्वी लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका बसत असताना, गावातच झाडांचे जतन करण्याचा वसा ग्रंथालयाने घेतला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब झाडाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला, तसेच विद्यार्थी व ग्रामस्थांना २०० नारळ रोपांचे वाटप करण्यात आले.
पर्यावरणाचा वाढता ऱ्हास रोखण्यासाठी श्री रत्नेश्वर ग्रंथालयाने ‘एक झाड – एक पुस्तक’ हा अभिनव उपक्रम गुरुवारी उत्साहात राबवला. “आम्ही केवळ झाड देऊन थांबत नाही, तर त्याचे संगोपन नीट होत आहे की नाही, याची माहिती आणि फोटो घेऊनच ‘वृक्षमित्र’ सन्मान देतो,” अशी माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार, ‘एक झाड आईच्या नावे’ ही संकल्पना घेऊन या झाडांना घरातील दिवंगत व्यक्तींची नावे देण्यात येत आहेत. याप्रसंगी ग्रंथालयाच्या आवारात डॉ. एन. पी. सांबरे यांच्या स्मरणार्थ उमेश कुळकर्णी यांच्या हस्ते नारळाचे झाड लावण्यात आले.
Ratnagiri Green Initiative: वृक्षमित्रांचा सन्मान आणि वाचन संस्कृतीला चालना
या कार्यक्रमादरम्यान गेल्या वर्षी दिलेली झाडे यशस्वीपणे जगवणाऱ्या ४० वृक्षमित्रांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याने, विद्यार्थ्यांना झाडासोबतच एक वाचनीय पुस्तकही भेट देण्यात आले. या अनोख्या उपक्रमाच्या वेळी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेतली.
या उपक्रमातून “एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया… एक पुस्तक वाचूया, ज्ञानदीप लावूया” हा अत्यंत महत्त्वाचा संदेश देण्यात आला. यंदाच्या वर्षी नागरिकांना नारळाची रोपे देण्यात आली आहेत. ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
झाडांच्या निगराणीसाठी ग्रंथालयाचे विशेष मार्गदर्शन
वाटप केलेली रोपे लोक जगवतील का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो; परंतु रत्नेश्वर ग्रंथालय याकडे विशेष लक्ष ठेवून असते. झाडांची निगा राखण्यासंबंधी आवश्यक त्या सर्व सूचना लाभार्थ्यांना दिल्या जातात. एवढेच नव्हे तर, आगामी काळात झाडांना लागणारे खतपाणी आणि इतर तांत्रिक मार्गदर्शनही ग्रंथालयामार्फत केले जाईल, अशी ग्वाही उमेश कुळकर्णी यांनी दिली आहे.
या पर्यावरणपूरक कार्यक्रमासाठी सरपंच अमर रहाटे, उपसरपंच सौ. ऋतुजा कुळकर्णी, रत्नागिरीच्या नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी, श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, उपाध्यक्ष अविनाश जोशी आणि तंटामुक्ती अध्यक्ष विजय निवेंडकर उपस्थित होते. तसेच सोसायटीचे सचिव सुनील लोगडे, दीपक जाधव, ग्रंथालयाचे चिटणीस मुकुंद जोशी, उपाध्यक्ष विलास पांचाळ, ग्रंथपाल केशव कुळकर्णी, संचालक प्रशांत रहाटे, विश्वास धनावडे, अनंत जाधव, सौ. स्मिता कुळकर्णी, अविनाश लोगडे, अन्वी वारशे, ग्रामपंचायत सदस्या सौ. वैष्णवी धनावडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ढापरे, अंगणवाडी सेविका, ओरी गावातील ग्रामस्थ शंतनू देसाई, राजेंद्र डाफळे, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 17-07-2026














