Guhagar-Vijapur Highway Protest: गुहागर-विजापूर महामार्गावरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; २० जुलैला ‘भीक मागो’ आंदोलन करण्याचा इशारा

करोडो रुपये खर्चूनही बहादूरशेख ते कुंभार्ली घाट रस्त्याची दुरवस्था; मनसेचा राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाब

चिपळूण:

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर करोडो रुपयांची उधळण करूनही रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि खड्ड्यांच्या साम्राज्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता रस्त्यावर उतरली आहे. Guhagar-Vijapur Highway Protest अंतर्गत येत्या २० जुलै रोजी मनसे वाहतूक सेनेतर्फे चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात ‘भीक मागो’ आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला आहे. “करोडो रुपये खर्च करूनही जर खड्डे भरण्यासाठी निधी नसेल, तर आम्ही भीक मागून पैसे गोळा करू आणि त्या निधीचे गाठोडे अधिकाऱ्यांच्या गळ्यात बांधू,” अशा शब्दांत खेतले यांनी सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कारभारावर तोफ डागली.

बहादूरशेख ते कुंभार्ली घाट रस्त्याची दयनीय अवस्था

राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर-विजापूर मार्गावरील बहादूरशेख नाका ते थेट कुंभार्ली घाटापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर जागोजागी प्रचंड मोठे खड्डे पडले असून, काँक्रीटची गटारे कोसळली आहेत. पावसाचे पाणी गटारांमधून वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरच तुंबत असल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे खराब झाला आहे. या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दोन्ही विभागांनी करोडोंचा निधी खर्च करूनही रस्ता ‘जैसे थे’

या महामार्गाच्या कामाबाबत माहिती देताना मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, बहादूरशेख ते पिंपळी हा रस्ता पूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात होता, तर कुंभार्ली घाटापर्यंतचा रस्ता ६ महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे. या दोन्ही विभागांनी आतापर्यंत या मार्गावर करोडो रुपयांचा निधी खर्च केला असल्याचा दावा केला आहे. मग एवढा मोठा निधी खर्च होऊनही रस्त्यावर खड्डेच असतील, तर तो पैसा गेला कुठे? असा संतप्त सवाल करत मनसेने उपअभियंत्यांना थेट जाब विचारला.

मनसैनिकांचा आक्रमक पवित्रा आणि अधिकाऱ्यांना अल्टीमेटम

या संदर्भात मनसे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीत पप्पू आंब्रे, गणेश खेडेकर, मिलिंद कदम, राजेंद्र गोजारी, आबा हटकर, विनोद चिपळूणकर, मंगेेश महाडिक, उमेश पवार, सुनील मोडक, चांद शहा, मुस्ताकिन चांद शहा, सुलेआम शेख, भाई सुर्वे यांसह अनेक मनसैनिक उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे पत्र दाखवण्याचा प्रयत्न केला असता, मनसेने तो फेटाळून लावला. “आम्हाला कागदी घोडे नकोत, तर रस्ता सुस्थितीत पाहिजे. सोमवारपर्यंत या मार्गावरील खड्डे बुजवा, अन्यथा २० जुलैला तीव्र आंदोलन होईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला. जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, तोपर्यंत रस्त्याच्या बाजूची साफसफाई करू दिली जाणार नाही, अशी भूमिकाही मनसेने घेतली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 17-07-2026