Kalavant Mandhan Yojna: रत्नागिरी जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांचे १४५ प्रस्ताव तीन महिन्यांपासून धूळखात!

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून मंजुरी रखडल्याने मानधन जमा नाही; वृद्ध कलावंतांची आर्त हाक

रत्नागिरी:

जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना उतरत्या वयात आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना’ (Kalavant Mandhan Yojna) सध्या प्रशासकीय अनास्थेच्या गर्तेत सापडली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांनी सादर केलेले सुमारे १४५ मंजुरीचे प्रस्ताव मागील तीन महिन्यांपासून मंजुरीविना धूळखात पडले आहेत. त्यामुळे “आमच्या हक्काच्या मानधनाकडे कोणी लक्ष देईल का?” अशी आर्त हाक जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक आणि कलावंत देत आहेत.

मानधनाची प्रक्रिया आणि दरवर्षी १०० कलावंतांची निवड

या कल्याणकारी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या वृद्ध कलावंतांच्या बँक खात्यात शासनाकडून थेट दरमहा ५ हजार रुपयांचे मानधन जमा केले जाते. या योजनेसाठी इच्छुक आणि पात्र कलाकार दरवर्षी तालुकास्तरावर आपले अर्ज सादर करत असतात. तालुकास्तरावरून छाननी झालेले हे अर्ज पुढील मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे पाठवले जातात. प्राप्त अर्जांमधून अंतिम पात्र लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी १०० कलावंतांची या योजनेचा लाभ देण्यासाठी निवड केली जात असल्याचे शासनाचे धोरण आहे.

Kalavant Mandhan Yojna: तालुकािन्हााय प्रस्तावांची संख्या

२०२५-२०२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सुमारे १४५ कलावंतांनी आपले प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले होते. जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची तालुकेनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

तालुकाप्रलंबित प्रस्तावांची संख्या
मंडणगड४५
रत्नागिरी२९
दापोली१९
चिपळूण११
संगमेश्वर११
राजापूर०८
खेड०७
लांजा०४
गुहागर०३

५ हजार रुपयांच्या मानधनाअभावी वृद्ध कलाकारांची उपासमार

शासकीय नियमांनुसार जिल्हास्तरीय समितीकडून निवड झाल्यानंतरच संबंधित वृद्ध कलावंतांच्या बँक खात्यात थेट मानधनाची रक्कम वर्ग होते. मात्र, मागील तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या स्तरावर हे प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने वृद्ध कलावंतांच्या खात्यात अद्याप ५ हजार रुपये जमा झालेले नाहीत. कलावंतांची उतरत्या वयात उपासमार होऊ नये हा या योजनेचा मुख्य हेतू असला, तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक वृद्ध कलाकारांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देऊन मानधन सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 17-07-2026