खासदार संजय राऊतांनी घेतली आंदोलकांची भेट; ‘इदी अमीन’च्या हुकूमशाहीशी केली केंद्र सरकारची तुलना
नवी दिल्लीतील जंतरमंतरवर NEET परीक्षा पेपरफुटी विरोधात पेटलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज आंदोलनस्थळाला प्रत्यक्ष भेट दिली. याप्रसंगी त्यांनी आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेला युवा नेता अभिजीत दीपके आणि उपस्थित आंदोलकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी, “काल दिल्लीच्या रस्त्यावर जो प्रकार घडला, तो लोकशाहीला लाजवणारा होता. जास्त तेल ओताल तर हे सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही,” असा संतप्त इशारा केंद्र सरकारला दिला.
उद्धव ठाकरेंचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा; उद्या वेळ पडली तर आम्हीही रस्त्यावर उतरू
संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकारण बाजूला ठेवून अभिजीत दीपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. “परवा मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेली रॅली ही अक्षरशः डोळे दिपवणारी होती. पुणे आणि नागपूरमध्येही युवक रस्त्यावर उतरले आहेत. ही क्रांतीची ठिणगी आता देशभर पसरत आहे,” असे ते म्हणाले.
सरकारच्या दडपशाहीवर टीका करताना राऊत म्हणाले:
“आम्ही तुमच्या जेलला किंवा बंदुकीच्या गोळ्यांना घाबरत नाही. आजही या देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यात आम्हीसुद्धा आहोत. काल दिल्लीत झालेला प्रकार इतका घृणास्पद होता की, मला थेट युगांडाच्या ‘इदी अमीन’ या हुकूमशहाची आठवण झाली.”
‘ही आग देशहिताची; धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीला मारले असते तर काय वाटले असते?’
जंतरमंतरवर लागलेली ही आग वैयक्तिक नसून देशहिताची व राष्ट्रहिताची आहे आणि ती सहजासहजी विझणार नाही, असे सांगत राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. देशातील शिक्षणमंत्र्यांना थेट सवाल करत राऊत म्हणाले, “काल झालेल्या लाठीचारात ज्या पद्धतीने निष्पाप विद्यार्थ्यांना मारहाण झाली, तशी मारहाण जर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीला झाली असती, तर त्यांना काय वाटले असते?”
‘ज्या मुलांनी सत्तेवर आणले, त्यांनाच आज दहशतवादी म्हणताय’
केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करताना संजय राऊत पुढे म्हणाले, “ही सर्व आपल्याच समाजाची आणि देशाची मुले आहेत. याच तरुणांनी १२ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींना विश्वासाने सत्तेवर आणले होते. कधीकाळी ही मुले तुमची भक्त होती, पण आज शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात त्यांनीच बंड पुकारले आहे. अशा वेळी त्यांना तुम्ही ‘दहशतवादी’ ठरवत आहात? हे मोदी सरकार ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यासमोर गुडघे टेकते, पण स्वतःच्या देशातील मुलांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर गुडघे टेकणार नाही.”
विरोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करत आहेत का? या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, “विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत आणि आम्ही एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:44 21-07-2026














