खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीत स्मृतीस्थळावर अभिवादन; सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
बारामती: ‘Ajit Pawar Jayanti’ निमित्त बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीदिनी अत्यंत भावूक वातावरणात आदरांजली अर्पण करण्यात आली. २८ जानेवारीला बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यानंतरची ही त्यांची पहिलीच जयंती असल्याने बारामती येथील स्मृतीस्थळावर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट देऊन दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी त्यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह कुटुंबीय व कार्यकर्ते उपस्थित होते.
Ajit Pawar Jayanti: “हा दिवस ‘जयंती’ म्हणून स्वीकारणे वेदनादायी”; सुनेत्रा पवार यांची भावूक पोस्ट
अजितदादांच्या पहिल्या जयंतीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट करून दिली. एवढी वर्षे ज्यांचा जन्मदिवस अत्यंत आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला, तोच दिवस आज ‘जयंती’ म्हणून मानताना मन आतून पार तुटून जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे कटू सत्य स्वीकारायला मन तयार होत नसून, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भक्कम आधार आणि ताकद बनून सोबत राहणारे दादा अचानक निघून गेल्याने सर्व काही पोरके झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दादांचे विचार, शिस्त आणि सेवाभाव कायम जिवंत राहील
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, काळाने आयुष्यातील सर्वात मोठा आधार इतक्या लवकर हिरावून नेईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आज हा दिवस साजरा करताना डोळ्यांतील अश्रू थांबत नसल्याचे त्यांनी सांगितले. अजितदादा आज शारीरिकदृष्ट्या सोबत नसले, तरी त्यांचे विचार, आठवणी, लोकांप्रती असलेला सेवाभाव, शिस्त आणि त्यांनी दिलेले प्रेम प्रत्येक श्वासात व कणाकणात कायम जिवंत राहील, अशा शब्दांत त्यांनी आपल्या आयुष्याच्या साथीदाराच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण व आदरपूर्वक प्रणाम केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 22-07-2026














