गृहमंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची राहुल गांधींची मागणी
नवी दिल्ली: ‘NEET Paper Leak Protest’ मुळे देशाची राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात संसदेच्या दिशेने कूच करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या हिंसक झडपांमध्ये अनेक आंदोलक आणि जवळपास ११८ पोलीस जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत असून सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनीही केंद्र सरकारच्या कारवाईचा धिक्कार केला आहे.
राहुल गांधी अन् प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेस नेत्यांचा पंतप्रधान निवासाबाहेर एल्गार
विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन छेडले. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले. जवळपास तीन तास ते पोलिसांच्या ताब्यात होते. या कारवाईच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्या सर्व खासदारांनी संसदेत काळे कपडे परिधान करून प्रवेश केला.
“हे लोकशाही नसून हुकूमशाही सरकार”; मल्लिकार्जुन खर्गे यांचा थेट आरोप
संसदेत प्रवेश करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. “हे लोकशाही सरकार नसून हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. भाजप आणि आरएसएस स्वयंसेवक विद्यार्थ्यांसह काँग्रेस नेत्यांना घाबरवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करत आहेत,” असा आरोप खर्गे यांनी केला. तर दुसरीकडे, प्रियंका गांधी यांनी “विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन ही बिघडलेली शिक्षण व्यवस्था बदलणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन केले.
राहुल गांधी यांच्या प्रमुख मागण्या:
- मंत्र्यांचे राजीनामे: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा.
- दोषींवर कारवाई व गुन्हे मागे: आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेतले जावेत.
- संसदेत चर्चा व माफी: उद्या लोकसभा आणि राज्यसभेत या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणावी तसेच केंद्र सरकारने आणि गृहमंत्र्यांनी देशातील तरुणांची माफी मागावी.
- शिक्षण व्यवस्थेत सुधारणा: परीक्षा आणि शिक्षण पद्धतीत तातडीने पारदर्शक सुधारणा कराव्यात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 22-07-2026














