साफसफाई करताना महिलेचा विजेच्या शॉकने मृत्यू

गॅलरीत पाय घसरला अन् विजेच्या उघड्या तारेला हात लागला; उपचारापूर्वीच मृत घोषित

दापोली: ‘दापोली अपघात’ प्रकरणातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. दापोली तालुक्यातील आडे कोळीवाडा येथे सार्वजनिक सभागृहाची साफसफाई करत असताना अचानक पाय घसरून पडल्याने एका ३८ वर्षीय महिलेचा विजेचा तीव्र शॉक लागून मृत्यू झाला आहे. पुष्पा जगदीश नांदगावकर (वय ३८, रा. आडे कोळीवाडा, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात घटनेची गांभीर्याने दखल घेत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गॅलरीत पाय घसरला अन् विजेच्या उघड्या तारेला हात लागला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत पुष्पा नांदगावकर या २१ जुलै रोजी संध्याकाळी आडे कोळीवाडा येथील झेंडेकर मंडळाच्या सार्वजनिक सभागृहात इतर महिलांसोबत स्वच्छता करत होत्या. साफसफाई करत असताना सभागृहाच्या गॅलरीत अचानक त्यांचा पाय घसरून तोल गेला. तोल सावरण्याच्या प्रयत्नात त्यांचा हात सभागृहाच्या बाजूने गेलेल्या मुख्य वीज वाहिनीच्या (मेन लाईन) उघड्या तारेला लागला. वीजप्रवाह अत्यंत तीव्र असल्याने त्यांना जबर शॉक बसला.

उपचारापूर्वीच मृत घोषित; दापोली पोलिसांकडून तपास सुरू

घटनेनंतर उपस्थितांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तातडीने उपचारासाठी आंजर्ले येथील डॉ. पाटील यांच्याकडे नेले. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे आडे कोळीवाडा परिसरावर शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची (आ.मृ. क्र. ५५/२०२६) नोंद करण्यात आली असून, पुढील कायदेशीर तपास दापोली पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 22-07-2026