धाराशिवच्या ‘माने दाम्पत्या’ला महापूजेचा मानाचा बहुमान
पंढरपूर (२५ जुलै २०२६): आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२५ जुलै रोजी) पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी संपूर्ण विठ्ठलनगरी भक्तीच्या अलोट महासागरात न्हाऊन निघाली आहे.
यंदाच्या आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी धाराशिव जिल्ह्याला मानाचा बहुमान मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगावचे रहिवासी असलेले माने दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले आहेत.
विठ्ठलाच्या महापूजेनंतर मुख्यमंत्री आणि माने दाम्पत्याने रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जाऊन मातेला दुग्धाभिषेक घातला व पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
“तरुणाईला दिशा देण्यासाठी पंतप्रधान मोदींना आशीर्वाद द्यावा” – मुख्यमंत्री
महापूजेनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“विठ्ठल मंदिरात आले की एक वेगळीच ऊर्जा मिळते. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, हेच विठुरायाच्या चरणी साकडे घातले आहे. तसेच देशातील तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी विठू माऊलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद द्यावा,” अशी प्रार्थना त्यांनी केली.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या नव्या भक्तनिवासाचे भूमिपूजन
शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरातील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पादुका मंदिराच्या नव्या भक्तनिवासाचे भूमिपूजन संपन्न झाले. या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. आळंदी देवस्थानच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या या नव्या भक्तनिवासामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची राहण्याची उत्तम सोय होणार आहे.
विठ्ठलनगरीत भक्तांचा महापूर; २५ किलोमीटरच्या लांबच लांब रांगा
आज पहाटेपासूनच पंढरपुरात वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा महापूर ओसंडून वाहत असून, विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांच्या तब्बल २० ते २५ किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.
पंढरपूर कॉरिडॉर: जुन्या पंढरपूरचे रूप डोळ्यात साठवणारे वारकरी
या आषाढी एकादशीनंतर मंदिर परिसरात विशाल असा ‘पंढरपूर विकास कॉरिडॉर’ उभारण्याचे काम सुरू होणार असल्याने जुने पंढरपूर इतिहासजमा होणार आहे. यामुळे शेकडो वर्षांचे वाडे आणि जुन्या इमारती काळाच्या पडद्याआड जातील.
यावर प्रतिक्रिया देताना बाधित नागरिकांनी, “यंदाची आषाढी ही आमच्या पिढ्यानपिढ्यांसाठी कायम स्मरणात राहील,” अशा भावना व्यक्त केल्या. तर प्रशासनाच्या वतीने, “भविष्यातील पुढील ५० वर्षांचा आणि वाढत्या भाविकांचा विचार करूनच ही विकासकामे हाती घेण्यात आली आहेत,” असे स्पष्ट करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 25-07-2026














