रत्नागिरी : बदलापूर येथील घटनेला एक महिना पूर्ण होत आहे. मात्र, जिल्ह्यामधील शाळांतील सीसीटीव्हीची आकडेवारी गुलदस्त्यातच आहे. हजारो शाळा अद्यापही कॅमेऱ्याच्या नजरेबाहेर आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कधी लागणार, असा प्रश्न पालकांतून विचारला जात आहे.
बदलापूरच्या एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला. त्यानंतर शासनाने राज्यातील सर्व शाळांत एका महिन्याच्या आत सीसीटीव्ही बसवावेत, असे आदेश २१ ऑगस्टला काढले होते. आता या गोष्टीला महिना झाला आहे. परंतु, जिल्ह्यातील हजारो शाळांत अद्यापही सीसीटीव्ही बसविले नाहीत. त्यामुळे शाळांतील मुली असुरक्षित असल्याचा दावा पालकांनी केला आहे.
शासनाने आदेश काढल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने ४७८ शाळांना पत्र काढून तातडीने सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आतापर्यंत किती शाळांत सीसीटीव्ही बसविले आहेत याची आकडेवारी माध्यमिक शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळांत सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे साडेआठ कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. जिल्हा नियोजन समितीने निधी मंजूर न केल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांत अद्यापही सीसीटीव्ही बसविले नाहीत. त्यामुळे पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकसहभागातून कॅमेरे बसविण्याची गरज जिल्हा परिषदेच्या शाळांत सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागितला आहे; मात्र अजून तो मंजूर झाला नाही. त्यामुळे लोकसहभागातून कॅमेरे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.
सीसीटीव्ही बसतील, पण बिलाचे काय
जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये वीज बिल भरताना शिक्षक तसेच पालकांची दमछाक होत आहे. जिल्हा परिषदेने आपल्या २३८९ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी साडेआठ कोटी रुपयांची मागणी जिल्हा नियोजनकडे केली आहे. निधी मंजूर न केल्यामुळे अजूनही सीसीटीव्ही बसलेले नाहीत. परंतु भविष्यात सीसीटीव्ही बसतील, पण वीज बिलाचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
जिल्हा परिषद शाळा -२४०८
सीसीटीव्ही संख्या -४७८
माध्यमिक शाळा -१९
सीसीटीव्ही संख्या -आकडेवारी उपलब्ध नाही
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 24/Sep/2024