जयगड तिहेरी खून प्रकरणात एपीआय कुलदीप पाटील यांच्या बडतर्फीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू

सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर व मयत तरुणाच्या आईच्या उपोषणाचा चौथा दिवस; प्रकृती खालावली तरी प्रशासकीय संवाद शून्य

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील बहुचर्चित आणि धक्कादायक तिहेरी खून प्रकरणात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक (PSI) कुलदीप पाटील यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर आणि मयत राकेश जंगम याची आई वंदना जंगम यांनी १५ ऑगस्ट २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणीही प्रतिनिधी संवादासाठी न आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सलग चार दिवस अन्नाचा कणही पोटात न गेल्याने दोन्ही उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे समोर आलेले गंभीर आरोप

संध्या कोसुंबकर यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या लेखी निवेदनात जयगड पोलीस आणि एपीआय कुलदीप पाटील यांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत:

  • गुन्हेगारांना पाठीशी घातल्याचा आरोप: जयगड खंडाळा येथील बार मालक दुर्वास पाटील याने सीताराम वीर, राकेश जंगम आणि भक्ती मयेकर या तिघांचे खून केल्याचे उघडकीस आले असून तो सध्या तुरुंगात आहे. दुर्वासने गावातील लोकांवर दहशत माजवली असताना आणि सीताराम वीरच्या मारहाणीत व मृत्यूस कारणीभूत ठरला असताना, एपीआय कुलदीप पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच त्याने दिवसाढवळ्या गुन्हा लपवल्याचा आरोप निवेदनात आहे.
  • मिसिंग तक्रार घेण्यास नकार व तपासात दिशाभूल: राकेश जंगम ०६/०६/२०२४ रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्याची आई वंदना जंगम पोलीस ठाण्यात गेली असता, एपीआय पाटील यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली.
  • ओळख परेड व पुरावे दडपणे: जयगड खंडाळा परिसरात बेवारस सांगाडा सापडल्यानंतर बेपत्ता राकेशच्या आईला ओळख पटवण्यासाठी न बोलवता, ज्यांनी खून केला त्या संशयितांनाच (दुर्वास पाटील व त्याचे वडील) बोलावून विचारणा करण्यात आली.
  • भक्ती मयेकरचा बळी टाळता आला असता: संशयितांची नावे सुरुवातीलाच लेखी स्वरूपात देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, ज्यामुळे पुढे जाऊन भक्ती मयेकर या निष्पाप तरुणीचाही खून झाला, असा आरोप करण्यात आला आहे.

एपीआय कुलदीप पाटील यांच्यावर बडतर्फीची आग्रही मागणी

एपीआय कुलदीप पाटील यांच्या केवळ निलंबनाने भागणार नसून, त्यांनी केलेल्या कथित कृत्यांमुळे आणि गुन्हेगारांना दिलेल्या संरक्षणामुळे निष्पाप ३ जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे त्यांची खातेनिहाय सखोल चौकशी व्हावी, त्यांचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासला जावा आणि पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी त्यांना सेवेतून थेट बडतर्फ (Dismiss) करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी या उपोषणाद्वारे करण्यात आली आहे.

Echelon prive

प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अन्यथा उपोषणकर्त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.