अर्जुन पुरस्कारांच्या यादीत एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही; विदित गुजराथी, दिव्या देशमुखसह ‘हे’ १७ खेळाडू सन्मानित
नवी दिल्ली:
भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ ची घोषणा केली असून यंदाच्या पुरस्कारांच्या यादीत एक मोठी आणि महत्त्वाची बाब समोर आली आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मानल्या जाणाऱ्या ‘मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारा’साठी यंदा एकाही खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे, विविध क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी करणाऱ्या १७ खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या संपूर्ण पुरस्कार यादीतून एकाही क्रिकेटपटूला स्थान मिळालेले नाही.
क्रीडा मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती (निवृत्त) अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली.
अर्जुन पुरस्कार २०२५ विजेत्यांची पूर्ण यादी
| खेळाडूचे नाव | क्रीडा प्रकार |
| तेजस्विन शंकर | ॲथलेटिक्स |
| मोहम्मद अजमल व्ही. | ॲथलेटिक्स |
| प्रियांका गोस्वामी | ॲथलेटिक्स |
| ट्रीसा जॉली | बॅडमिंटन |
| गायत्री गोपीचंद | बॅडमिंटन |
| नरेंद्र | बॉक्सिंग |
| विदित संतोष गुजराथी | बुद्धिबळ |
| दिव्या जितेंद्र देशमुख | बुद्धिबळ |
| धनुष श्रीकांत | बधिर नेमबाजी (Def Shooting) |
| लालरेमसियामी | हॉकी |
| राजकुमार पाल | हॉकी |
| सुरजीत | कबड्डी |
| पूजा | कबड्डी |
| रुद्रांश खंडेलवाल | पॅरा-शूटिंग |
| एकता भयान | पॅरा-ॲथलेटिक्स |
| अरविंद सिंग | रोइंग |
| अखिल श्योराण | नेमबाजी (Shooting) |
यंदा ‘खेलरत्न’ का हुकला?
खेलरत्न पुरस्कारासाठी तिरंदाज ज्योती सुरेखा वेण्णम, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्या नावांची जोरदार चर्चा होत. १२ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत या नावांवर विचारमंथनही झाले, परंतु अंतिम शिफारस यादीत एकाही नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. त्यामुळे यंदाचा खेलरत्न पुरस्कार कोणालाही न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बुद्धिबळपटू विदित गुजराथी, दिव्या देशमुख, बॅडमिंटनची ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांसारख्या तरुण खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने क्रीडा क्षेत्रातून आनंदाचे वातावरण व्यक्त केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 18-08-2026














