कोरोना काळापासून आठवड्यातून गुरुवारी आणि शुक्रवारीच सेवा; खरेदीखत व दस्तनोंदणीसाठी नागरिकांचे हाल
गुहागर:
Guhagar Sub Registrar Office नियमितपणे सुरू ठेवण्यात यावे, अशी जोरदार मागणी गुहागर तालुक्यातील ग्रामस्थ आणि नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील हे अत्यंत महत्त्वाचे शासकीय कार्यालय कोरोना काळापासून आठवड्यातून केवळ गुरुवार आणि शुक्रवार असे दोनच दिवस चालू ठेवण्यात येत आहे. आठवड्यातून अवघे दोन दिवस कामकाज होत असल्याने संपूर्ण तालुक्यातील जनतेची मोठी गैरसोय होत आहे.
दस्तनोंदणी आणि शासकीय कामकाजांना विलंब
कार्यालय केवळ दोन दिवस उघडे राहत असल्यामुळे खरेदीखत, बक्षीसपत्र, मुखत्यारपत्र, बँकेचा बोजा चढवणे आणि गहाणखत यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या दस्तनोंदणीच्या कामांना मोठा विलंब होत आहे. याशिवाय मूल्यांकन मिळणे, नक्कलीची प्रत मिळणे, सर्च पावती मिळणे यांसारख्या प्रशासकीय सेवाही वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
इंटरनेट, वीजपुरवठ्याचा लपंडाव आणि आर्थिक भुर्दंड
अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची कार्यालयात प्रचंड गर्दी जमते. त्यातच इंटरनेट सेवेतील व्यत्यय आणि वीजपुरवठ्याचा लपंडाव यामुळे कामांचा खोळंबा होतो. काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या खरेदीदारांना वारंवार गुहागर शहरात फेऱ्या माराव्या लागत असून त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
Guhagar Sub Registrar Office नियमित सुरू झाल्यास महसुलात होणार वाढ
वरिष्ठांनी तातडीने दखल घेण्याची मागणी
हे कार्यालय आठवडाभर नियमितपणे सुरू राहिल्यास दस्तनोंदणीची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. त्यामुळे शासनाच्या महसुलात वाढ होण्यासोबतच नागरिकांना सर्व सेवा त्वरित उपलब्ध होण्यास मदत होईल. या सर्व बाबींचा विचार करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी आणि गुहागरमधील सहदुय्यम निबंधक कार्यालय आठवडाभर नियमित सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 20-08-2026














