दोन वर्षांपूर्वी बसवलेले पथदीप दीड वर्षापासून बंद; गणेशोत्सवापूर्वी दिवे सुरू करण्याची मागणी
रत्नागिरी:
Bhatye Street Lights Problem प्रकरणी शहराजवळील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या भाट्ये येथे रस्त्यावर पथदीप असूनही अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागामार्फत दोन वर्षांपूर्वी भाट्ये बसथांबा ते झरी विनायक मंदिरापर्यंत लाखो रुपये खर्चून पथदीप बसवण्यात आले होते. मात्र, हे दिवे गेल्या दीड वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे.
ग्रामस्थ आणि महिला-बालकांची मोठी गैरसोय
भाट्ये सुरू बनामधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी झरी विनायक ते भाट्ये बसथांब्यापर्यंत चालत जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा झाडी असल्याने आणि मोकाट जनावरे, कुत्रे व सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने विशेषतः महिला आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अत्यंत धोकादायक ठरत आहे.
निकृष्ट कामामुळे वीज वाहिन्यांमध्ये दोष?
ठेकेदाराने वीज खांबांसाठी टाकलेल्या वीज वाहिन्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. दिव्यांना जोडणाऱ्या तारा सदोष असल्यानेच हे पथदीप बंद पडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी आणि पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.
“दोन वर्षांपूर्वी हे वीज दिवे बसवण्यात आले होते; मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते बंद आहेत. ते सुरू करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला भाट्ये ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.”
— पराग भाटकर (माजी सरपंच, भाट्ये)
Bhatye Street Lights Problem: गणेशोत्सवापूर्वी उपाययोजनेची मागणी
गणेशोत्सव आणि पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर तातडीने दुरुस्ती करा
येत्या महिन्याभरावर गणेशोत्सव सण येऊन ठेपला आहे, तसेच पर्यटन हंगामही पुन्हा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने वेळेत लक्ष घालून हे बंद पथदीप तातडीने सुरू करावेत, अशी जोरदार मागणी भाट्ये ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 20-08-2026














