मोठा निधी खर्च करूनही योजना अपूर्ण; कंत्राटदारावर गुन्हे दाखल करून ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची मागणी
देवरुख:
Kondgaon Jal Jeevan Mission योजनेतील अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव (बाईगवाडी) येथे समोर आला आहे. लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च करूनही ही पाणीपुरवठा योजना अपूर्ण स्थितीत असून, निकृष्ट दर्ज्याच्या बांधकामामुळे ग्रामस्थांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते नीलेश सावंत यांनी थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे.
नवीन पंपिंग रूममधून पाणी गळती; वीज मीटरमध्ये पाणी शिरण्याचा धोका
तक्रारीनुसार, कंत्राटदाराने या ठिकाणी जुनी पंपिंग रूम पूर्णपणे तोडून त्याच जागेवर नवीन पंपिंग रूम बांधली आहे. मात्र, हे नवीन बांधकाम इतके निकृष्ट दर्जाचे आहे की, मुसळधार पावसामुळे छतातून आणि भिंतींमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत आहे. योजना अपूर्ण असल्याने आजही गावाला जुन्या कार्यरत वीज मीटरमधून पाणी पुरवठा केला जातो. धोकादायक बाब म्हणजे, नवीन रूममधील गळतीचे हे पाणी थेट चालू वीज मीटरमध्ये जात आहे, ज्यामुळे पाणी सोडण्यासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू ओढवण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
या गंभीर तांत्रिक दुरावस्थेबाबत आणि विजेच्या धोक्याबाबत कोंडगाव ग्रामपंचायतीकडेही रीतसर तक्रार करण्यात आली होती. तरीही अद्याप कोणतीही प्रशासकीय उपाययोजना करण्यात आलेली नाही. गावाला पाणी पुरवणाऱ्या मुख्य ठिकाणी एवढा मोठा मृत्यूचा सापळा तयार झाला असतानाही स्थानिक प्रशासन ढिम्म का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
Kondgaon Jal Jeevan Mission बाबत कडक कारवाईची मागणी
कंत्राटदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ करून तांत्रिक ऑडिट करण्याची मागणी
या प्रकरणी दोषी कंत्राटदार आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच संबंधित ठेकेदाराला त्वरित ‘ब्लॅकलिस्ट’ (काळ्या यादीत) टाकून संपूर्ण प्रकल्पाचे तांत्रिक ऑडिट (Technical Audit) करण्यात यावे.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
वीज मीटरमधील पाण्याच्या धोक्याची गंभीर दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायतीने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या लेखी तक्रारीनंतर आता जिल्हा परिषद प्रशासन आणि पाणीपुरवठा विभाग यावर काय ठोस कारवाई करते, याकडे कोंडगाव बाईगवाडीतील सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 20-08-2026














