MPSC कडून FDA औषध निरीक्षक भरती प्रक्रिया अखेर रद्द; पेपरफुटीच्या आरोपांनंतर आयोगाचा मोठा निर्णय, आता होणार फेरपरीक्षा

गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक अहवालानंतर निर्णय; ५०६ पात्र उमेदवारांची प्रक्रिया रद्द, विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार नाही

मुंबई:

अन्न व औषध प्रशासनातील (FDA) औषध निरीक्षक, गट-ब पदांच्या भरती परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षा पद्धतीची पारदर्शकता, निष्पक्षता आणि उमेदवारांचा विश्वास कायम राखण्यासाठी ही सर्व भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असून लवकरच यासाठी फेरपरीक्षा आयोजित केली जाणार आहे.

गुन्हे अन्वेषण शाखेचा अहवाल ठरला निर्णायक

MPSC मार्फत २९ जुलै २०२५ रोजी या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २२ मार्च २०२६ रोजी ६ विभागीय मुख्यालयांमध्ये ऑफलाईन पद्धतीने चाळणी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून २०२६ रोजी जाहीर झाला आणि मुलाखतीसाठी ५०६ उमेदवार पात्र ठरले होते. १ जुलै ते २२ जुलै २०२६ दरम्यान ४८८ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण होऊन २२ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादीही प्रसिद्ध करण्यात आली होती.

मात्र, २२ ते २६ जुलै २०२६ दरम्यान परीक्षा सुरू होण्यापूर्वीच (२० मार्च २०२६ रोजी) प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर लीक झाल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी आणि उमेदवारांकडून ईमेलद्वारे MPSC कडे प्राप्त झाल्या. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आयोगाने २७ जुलै २०२६ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. पोलीस उपआयुक्त (गुन्हे अन्वेषण शाखा), मुंबई यांनी सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे व त्याने त्याचा गैरलाभ घेतल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.

राजकीय आणि विद्यार्थी आंदोलनाचा दणका

या प्रकरणात सर्वात आधी आमदार रोहित पवार यांनी पेपरफुटीचे आरोप केले होते. तसेच MPSC च्या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन दाद मागितली होती, तर पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमातही एका विद्यार्थिनीने हा मुद्दा लावून धरला होता. या वाढत्या दबावानंतर आणि पोलीस अहवालानंतर आयोगाने भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला.

फेरपरीक्षेबाबत MPSC ची महत्त्वाची माहिती

MPSC ने स्पष्ट केले आहे की औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी फेरपरीक्षा आयोजित केली जाईल. यासाठी जुन्या उमेदवारांना:

फेरपरीक्षेचे सुधारित वेळापत्रक आणि प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर केले जाईल.

पुन्हा नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 26-08-2026