Sanskrit Saptah Festival: रत्नागिरीत ‘संस्कृत सप्ताह महोत्सवा’चे आयोजन; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

सुभाषित पठण, ‘कृष्णरंग’, मुग्धा भट-सामंत यांची ‘संस्कृतगीतसंध्या’ आणि व्याख्यानांचे रत्नागिरीत आयोजन

संस्कृतभारती दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने रत्नागिरी शहरात २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान ‘संस्कृत सप्ताह महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने रत्नागिरीतील संस्कृतप्रेमी आणि नागरिकांसाठी विविध दर्जेदार, ज्ञानवर्धक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध असणार आहे.

सुभाषित पठणाने महोत्सवाचा प्रारंभ; साळवी स्टॉप येथे रंगणार नगर संस्कृत दिनोत्सव

या महोत्सवाचा शुभारंभ शालांतर्गत निवडक १० सुभाषितांच्या पठणाने झाला. २६ ऑगस्ट रोजी साळवी स्टॉप येथील बाळासाहेब ठाकरे यूथ ॲक्टिव्हिटी सेंटर येथे ‘नगर संस्कृत दिनोत्सव’ साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, नगरसेवक सौरभ मलुष्टे आणि नगरसेविका सौ. पूजा पवार प्रमुख उपस्थित राहणार असून शालेय विद्यार्थ्यांचे प्रतिभा प्रदर्शन व ज्येष्ठांचे मार्गदर्शन होणार आहे.

कृष्णरंग, ऑनलाइन व्याख्यान आणि संभाषण शिबिर समारोप

२७ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर-आयटीआय जोडरस्त्यावरील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात नारायणी पठण मंडळातर्फे ‘कृष्णरंग’ या कृष्णाशी संबंधित स्तोत्रपठणाचा कार्यक्रम सादर केला जाईल. २८ ऑगस्ट रोजी संस्कृतभारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते महाबलजी भट्ट यांचे ‘धन्यो गृहस्थाश्रम:’ या विषयावर गूगल मीटच्या माध्यमातून ऑनलाइन व्याख्यान होईल. तसेच, २९ ऑगस्ट रोजी जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतिगृहात सुरू असलेल्या संस्कृत संभाषण शिबिराचा समारोप होणार आहे.

संस्कृतगीतसंध्या आणि ‘प्राचीन भारतीय न्यायव्यवस्था’ विषयावर व्याख्यान

महोत्सवाच्या अंतिम टप्प्यात ३० ऑगस्ट रोजी झाडगाव येथील माधवराव मुळे भवन येथे प्रसिद्ध गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांची ‘संस्कृतगीतसंध्या’ आयोजित करण्यात आली आहे. यात मराठीतील प्रसिद्ध भक्तिगीते व नाट्यगीतांच्या संस्कृत अनुवादाचा कार्यक्रम होईल, ज्याला हेरंब जोगळेकर (तबला) आणि श्रीरंग जोगळेकर (संवादिनी) साथ करतील. महोत्सवाच्या सांगता दिवशी, ३१ ऑगस्ट रोजी शिर्के प्रशालेतील रंजन मंदिर येथे अधिवक्ता परिषद व संस्कृतभारतीच्या संयुक्त विद्यमाने ॲड. फणसेकर यांचे ‘प्राचीन भारतीय न्यायव्यवस्था’ या विषयावर विशेष व्याख्यान पार पडेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 26-08-2026