CTET Exam 2026: राज्य TET नंतर आता केंद्र सरकारची CTET परीक्षाही पुढे ढकलली; परीक्षार्थींमध्ये तीव्र असंतोष

नोकरी टिकवण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असताना परीक्षांच्या अनिश्चिततेमुळे भावी शिक्षक तणावात

शिक्षकांची आणखी किती परीक्षा पाहणार? असा संतप्त सवाल सध्या महाराष्ट्रातील भावी शिक्षकांकडून विचारला जात आहे. महाराष्ट्रात जून महिन्यात होणारी राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणामुळे लांबणीवर पडली असताना, आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET Exam 2026) देखील पुढे ढकलली आहे. दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबल्याने उमेदवारांमध्ये मोठा मनस्ताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीबीएसईचा नोंदणीचा निर्णय; अभ्यास करणाऱ्या शिक्षकांना मनस्ताप

CBSE कडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शिक्षकांना यापूर्वी CTET परीक्षेसाठी नोंदणी करता आली नव्हती, त्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी देण्यासाठी आणि व्यापक विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. एका बाजूला शाळांमध्ये ५ ते ६ तास अध्यापन करणे आणि त्यानंतर परीक्षेचा अभ्यास करणे, असा दुहेरी ताण शिक्षक सहन करत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नोकरी टिकवण्याचा तणाव

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांसाठी टीईटी (TET) किंवा सीटीईटी (CTET) परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोकरी टिकवण्यासाठी ही परीक्षा पास होण्याशिवाय शिक्षकांकडे पर्याय उरलेला नाही. सरकार आणि न्यायव्यवस्था परीक्षा देणे अनिवार्य करत असली, तरी या परीक्षा नेमक्या कधी आयोजित केल्या जाणार? याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाकडे नाही.

शालेय शिक्षण विभागाकडे परीक्षेच्या तारखांचे उत्तर नाही

२८ जून रोजी प्रस्तावित असलेली राज्याची टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलण्यात आली होती. दोन महिने उलटूनही महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे ही परीक्षा पुन्हा कधी होणार याचे कोणतेही अधिकृत उत्तर उपलब्ध नाही. राज्य टीईटी लांबल्याने केंद्रीय सीटीईटी परीक्षेचा पर्याय शिक्षकांसमोर होता; मात्र आता ६ सप्टेंबरची सीटीईटी परीक्षाही पुढे ढकलल्याने उमेदवारांचे भवितव्य अधांतरी सापडले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 26-08-2026