अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सतीश पालकर, सचिवपदी जमीर खलफे, कार्याध्यक्षपदी रहीम दलाल यांची निवड
रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत मराठी पत्रकार परिषद, तालुका रत्नागिरीच्या नवीन कार्यकारीणीची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली. संघटनेचे काम अधिक गतीने व प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या नवीन कार्यकारीणीत तालुका अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ पत्रकार सतीश पालकर यांच्याकडे सोपवण्यात आली असून कार्याध्यक्षपदी रहीम दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्ष म्हणून अमोल मोरे आणि शकील गव्हाणकर जबाबदारी सांभाळणार आहेत.
संस्थेच्या प्रशासकीय व संघटनात्मक कामकाजाची महत्त्वाची सूत्रे मुख्य सचिव जमीर खलफे यांच्याकडे सोपवण्यात आली असून, त्यांना सहसचिव म्हणून अवनी पिलणकर सहकार्य करतील. संघटनेचा आर्थिक लेखाजोखा सांभाळण्यासाठी खजिनदारपदी प्रशांत हरचेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्याच्या डिजिटल युगातील आधुनिक गरजा आणि सोशल मीडियाचे वाढते महत्त्व विचारात घेऊन सोशल मीडिया प्रमुख म्हणून कांचन मालगुंडकर आणि राजन चव्हाण यांची निवड करण्यात आली. तसेच तालुकाभरातील सर्व पत्रकारांना एकत्र आणून संघटन मजबूत करण्यासाठी अमोल डोंगरे आणि विजय बासुतकर हे संघटन प्रमुख म्हणून कार्य करतील.
पत्रकारांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी व सांस्कृतिक उपक्रमांना गती देण्यासाठी सचिन बोरकर आणि शुभम पवार यांची सांस्कृतिक प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. नवनिर्वाचित समितीला वेळेोवेळी योग्य मार्गदर्शन लाभावे याकरिता भालचंद्र नाचणकर, शोभना कांबळे, विभा कदम आणि संजय वैश्यपायन यांची सल्लागार मंडळात निवड करण्यात आली आहे.
कार्यकारीणीचे सदस्य म्हणून मनोज लेले, अजय सावंत, श्रीहरी तांबट, समीर शिगवण, जाकीर पिरजादे आणि अनिकेत पावसकर हे काम पाहणार आहेत.
शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष हेमंत वणजू, जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर आणि जिल्हा कार्याध्यक्ष राजेश शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. या नव्या निवडीमुळे रत्नागिरी तालुक्यातील पत्रकारांच्या हक्कांना आणि विविध प्रश्नांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे रत्नागिरीतील पत्रकारिता, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:54 26-08-2026














