दुकानात फक्त क्यूआर कोड किंवा टोकन दाखवताच शेतकऱ्यांना त्वरित मिळणार खत; रांगा आणि प्रतीक्षेचा त्रास संपणार
रत्नागिरी जिल्ह्यातील खत खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि जलद करण्यासाठी केंद्र शासनाने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) हे नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले आहे. कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत या प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर २५ ऑगस्टपासून रत्नागिरी जिल्ह्यातही ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या आपल्या गरजेनुसार खताची आगाऊ नोंदणी करता येणार असून, दुकानांसमोरील रांगा व प्रतीक्षेचा त्रास पूर्णपणे कमी होणार आहे.
या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना जमिनीचे क्षेत्रफळ व पिकाचा प्रकार नोंदवल्यानंतर आवश्यक खताची मात्रा (GFR) शास्त्रीय पद्धतीने निश्चित करण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून परिसरातील अधिकृत परवानाधारक विक्रेत्याची निवड शेतकऱ्यांना करता येईल. तसेच, अनुदानित खतांचा गैरकृषी वापर, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासही या प्रणालीची मोठी मदत होणार आहे. युरियाचा अतिवापर टाळण्यासाठी शासनाने प्रति शेतकरी, प्रति हेक्टर, प्रति हंगाम जास्तीत जास्त ५ गोण्या युरिया आणि ४ गोण्या डीएपी खरेदीची मर्यादा निश्चित केली आहे.
आवश्यक FFS ॲप गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असून त्यासाठी इंटरनेटसह स्मार्टफोन आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. राज्य निवडल्यानंतर फार्मर आयडी किंवा आधार क्रमांकाद्वारे OTP घेऊन लॉगिन करता येते. फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांची जमिनीची माहिती आपोआप उपलब्ध होईल; तर आयडी नसल्यास कुळ किंवा मालकी हक्क निवडून सर्व्हे क्रमांकासह जमिनीचा तपशील भरावा लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळणारा क्यूआर कोड व टोकन क्रमांक सुरक्षित ठेवावा. दुकानात खत घेण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीकडे मूळ आधारकार्ड आणि बुकिंगचा क्यूआर कोड असणे अनिवार्य आहे.
ॲप वापराबाबत अडचण अथवा तक्रारींसाठी कृषी विभागाने तालुकानिहाय हेल्पडेस्क सुरू केले आहेत. रत्नागिरीसाठी राजेंद्र कुमार, राजापूरसाठी विद्या तिष्टक (९१८४२०८०६४), लांजासाठी सुभाष गुरव, चिपळूणसाठी भीमाशंकर कोळी, गुहागरसाठी कपिल चिंगळे, संगमेश्वरसाठी चंद्रकांत कोळी व पी. एस. सुर्वे, दापोलीसाठी वर्षा गोरीवले व श्वेता शिंदे, खेडसाठी जगदीश शिंदे आणि मंडणगडसाठी घनश्याम अमंग यांच्याशी संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी जवळच्या खत विक्रेत्याशी, तालुका व मंडळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:07 26-08-2026














