जिल्ह्यातील पहिल्या अनोख्या उपक्रमाद्वारे गणेशभक्तांना पारितोषिकांची मोठी संधी; १० सप्टेंबरपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
रत्नागिरी :
रत्नागिरीतील अत्यंत लोकप्रिय मानली जाणारी ‘कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा’ यंदा आपल्या सातव्या वर्षात पदार्पण करत असून गणेशभक्तांसाठी एक नवा आणि महत्त्वपूर्ण बदल घेऊन आली आहे. रत्नागिरी तालुकास्तरावर आयोजित या स्पर्धेत यंदा प्रथमच देखावा (चालचित्र/स्थिरचित्र) आणि आकर्षक आरास असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. अशा प्रकारे दोन वेगळ्या विभागांत पारितोषिके देणारी ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच स्पर्धा ठरणार आहे. या उपक्रमामुळे दरवर्षी फक्त आरास करणाऱ्या गणेशभक्तांवर होणारा अन्याय दूर होणार असून, दोन्ही विभागांना आता स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत, अशी माहिती ‘कांचन डिजिटल’चे संचालक तथा प्रसिद्ध छायाचित्रकार कांचन मालगुंडकर यांनी दिली आहे.
गणेशभक्तांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नवा निर्णय
दरवर्षी या स्पर्धेमध्ये काहीतरी नवीन करण्याची परंपरा ‘कांचन डिजिटल’ने जपली आहे. गतवर्षीपर्यंत देखावे आणि आरास या दोन्हींचे एकत्रित परीक्षण केले जात होते. मात्र, यामुळे कल्पक, सुबक आणि नाविन्यपूर्ण आरास करणाऱ्या गणेशभक्तांच्या पाठीवर योग्य कौतुकाची थाप पडत नव्हती. यावर तोडगा म्हणून यंदा दोन्ही विभागांची वर्गवारी वेगळी करण्यात आली आहे. देखावा आणि आरास या दोन्ही विभागांत आता स्वतंत्रपणे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके दिली जातील. याशिवाय देखावा विभागात दरवर्षीप्रमाणे विशेष उल्लेखनीय, प्रोत्साहनपर आणि उत्तेजनार्थ पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे.
‘सुबक गणेशमूर्ती’ पारितोषिक थेट मूर्तिकाराला
यंदाच्या स्पर्धेतही ‘सुबक गणेशमूर्ती’ या विशेष पारितोषिकाचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या घरगुती गणेशोत्सवातील मूर्तीचीच या पारितोषिकासाठी निवड केली जाईल. विशेष म्हणजे, हे पारितोषिक घर मालकाला न मिळता ती गणेशमूर्ती साकारणाऱ्या गणेशमूर्तिकाराला देऊन त्याचा गौरव केला जाणार आहे.
स्पर्धेची नियमावली आणि नावनोंदणीची प्रक्रिया
गणेशभक्तांचा वाढता प्रतिसाद पाहता यंदाही ही स्पर्धा रत्नागिरी तालुकास्तरावर भव्य स्वरूपात घेतली जात आहे. स्पर्धेच्या पारदर्शक आणि सुटसुटीत आयोजनासाठी आयोजकांनी खालील नियम निश्चित केले आहेत:
- नावनोंदणीची अंतिम तारीख: गुरुवार, १० सप्टेंबर.
- परीक्षण: मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळपासून सुरू होईल. (गणपती आगमनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच परीक्षणाच्या वेळी सजावट पूर्ण असणे बंधनकारक आहे.)
- पर्यावरणपूरक सजावट: थर्मोकॉल, प्लास्टिक आणि फ्लेक्स यांसारख्या पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या साहित्याचा वापर टाळणाऱ्या सजावटीला प्राधान्य दिले जाईल.
- आशय आणि सुबकता: सजावट व मूर्तीमध्ये सुबकता असण्यासोबतच पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक संदेश असणे आवश्यक आहे.
- प्रवेशिका नियम: प्रवेशिका पाठवताना सहभागी होणारा विभाग (देखावा किंवा आरास) स्पष्ट नमूद करावा. व्हॉट्सॲपवर नाव, पूर्ण पत्ता, व्हॉट्सॲप क्रमांक, अन्य एक संपर्क क्रमांक आणि सजावटीचा संपूर्ण फोटो पाठवणे अनिवार्य आहे.
- परीक्षक निर्णय: स्पर्धेचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांद्वारे केले जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम राहील. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
नावनोंदणीसाठी ९४२२५७६७३६ या क्रमांकावर आणि अधिक माहितीसाठी ८९९९३३२७५७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार बक्षीस वितरण
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दरवर्षीप्रमाणे यंदाही दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत दर्जेदार आणि भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार असून, बक्षीस वितरणाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ‘कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा’ कार्यकारिणी सज्ज झाली आहे. यामध्ये कांचन मालगुंडकर, मुकेश गुंदेजा, नरेंद्र पाटील, अभिजीत नांदगावकर, मुकुंद विलणकर, विजय पाडावे, विजय बासुतकर, निलेश जगताप, ओमकार पाटणकर, बाळकृष्ण चव्हाण, शकील गव्हाणकर, तन्मय दाते, अजिंक्य सनगरे, मंथन मालगुंडकर, श्रावणी मालगुंडकर आणि दीपिका कुबल हे सदस्य अहोरात्र मेहनत घेत आहेत. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त गणेशभक्तांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 27-08-2026














