पहिल्याच दिवशी कार्ड असूनही रिचार्जअभावी पूर्ण तिकीट काढण्याची नामुष्की; मुदतवाढ देण्याची प्रवाशांची मागणी
रत्नागिरी:
NCMC Card Mandatory for MSRTC Concessions संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, महिला व अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी मंगळवारी १ सप्टेंबरपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) अनिवार्य केले आहे. मात्र पहिल्याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात सावळागोंधळ पाहावयास मिळाला. रत्नागिरी-राजापूर आणि लांजा-रत्नागिरी मार्गावरील बसमध्ये प्रवास करताना सवलतधारकांकडे कार्ड असूनही रिचार्ज नसल्याच्या कारणावरून पूर्ण तिकीट काढावे लागले, ज्यामुळे प्रवासी व वाहकांमध्ये (Conductors) मोठे वाद झाले.
नोंदणी पूर्ण, पण कार्डची वाट पाहण्याची वेळ
बोगस प्रवाशांना आळा घालण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने जानेवारीपासून एनसीएमसी कार्ड काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी दोन ते तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात आजअखेर २ लाखांहून अधिक सवलतधारकांनी एनसीएमसी कार्ड काढले आहेत, तर सुमारे ४० हजार जणांची नोंदणी रत्नागिरी विभागात झाली आहे. तथापि, एकूण ७ लाख सवलतधारकांपैकी जवळपास ५ लाख सवलतधारकांचे कार्ड नोंदणी किंवा वितरण अद्याप प्रलंबित आहे. ज्यांनी नोंदणी केली मात्र कार्ड आले नाही, त्यांनाही १०० टक्के पूर्ण तिकीट काढावे लागत आहे.
तांत्रिक बिघाडामुळे रिचार्जची अडचण
पहिल्याच दिवशी संबंधित मशीनमधील सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून अनेक ठिकाणी कार्ड रिचार्ज करून दिले गेले नाही. त्यामुळे सवलतधारकांना नाइलाजाने पूर्ण तिकीट खरेदी करावे लागले. प्रत्येक बसस्थानकात रिचार्जची सुविधा करण्यात आली असली तरी अचानक लागू केलेल्या या नियमामुळे सवलतधारक प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
मुदतवाढ देण्याची मागणी आणि विभागाचा इशारा
महामंडळाने नियम बंधनकारक करण्यापूर्वी सर्व सवलतधारकांना स्मार्ट कार्डचे वाटप करणे आवश्यक होते, त्यामुळे आणखी काही दिवस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
“महामंडळाच्या सूचनेनुसार एनसीएमसी कार्ड जिल्ह्यात बंधनकारक आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांचे तिकीट स्मार्ट कार्डमधून वितरीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहकांनी प्रवाशांशी वाद घालू नये, वाहकांनीच एनसीएमसी कार्डचे टॉपअप करावयाचे आहे. प्रत्येक बसस्थानकात रिचार्जची सुविधा केली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रवाशांनी प्रवासावेळी कार्ड सोबत ठेवावे.”
— अश्वजीत जानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 02-09-2026














