चिपळूणमध्ये ७/१२ फेरफार नोंदीसाठी ₹१० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात

पाग नाका येथे कारमध्ये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; महिनाभरात चिपळूण महसूल विभागातील दुसरी मोठी कारवाई

चिपळूण / रत्नागिरी : जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी रद्द केलेली फेरफार नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच घेताना चिपळूणचे मंडळ अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रंगेहात ताब्यात घेतले. मुंबई-गोवा महामार्गावरील पाग नाका, पॉवर हाऊस परिसरात सायंकाळी ही धडक कारवाई करण्यात आली.

रद्द केलेली फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मागितली लाच

प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी:

  • ७/१२ उताऱ्यासाठी अर्ज: तक्रारदाराने मौजे चिपळूण येथे भूमापन क्रमांक १७४/१अ ही जागा खरेदी केली होती. सदर जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे व पत्नीचे नाव दाखल होऊन फेरफार मंजूर होण्यासाठी त्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता.
  • नोंद केली रद्द: ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी ११ जून २०२६ रोजी फेरफार नोंद घातली होती; मात्र मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के यांनी ८ जुलै २०२६ रोजी ही नोंद रद्द केली.
  • लाचेची मागणी व तगादा: तक्रारदाराने २ ऑगस्ट रोजी महसूल कर्मचारी पतसंस्थेत राजेशिर्के यांची भेट घेतली असता, रद्द झालेली नोंद मंजूर करण्यासाठी त्यांनी ₹ १०,०००/- च्या लाचेची मागणी केली. त्यानंतर २३ व २७ ऑगस्ट रोजी फोन करून फेरफार नोंद मंजूर केल्याचे सांगत लाचेच्या रकमेसाठी वारंवार तगादा लावला.

कारमध्येच स्वीकारली लाच; एसीबीने आवळल्या मुसक्या

लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने २ सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली.

  • पडताळणी: दीपक लॉजसमोर, भोगाळे येथे तक्रारदाराच्या गाडीत पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाली.
  • सापळा कारवाई: २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०५ वाजता पाग नाका, पॉवर हाऊस येथील मुंबई-गोवा महामार्गावर एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराच्या गाडीत बसून पंचांसमक्ष १० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के यांना पथकाने रंगेहात पकडले.

याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महिनाभरातील दुसरी कारवाई; महसूल वर्तुळात खळबळ

जमिनीच्या खरेदी खताची सातबारा उताऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ५ ऑगस्ट रोजी सावर्डे (ता. चिपळूण) येथील मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव यांना एसीबीने रंगेहात पकडले होते. महिनाभरातच चिपळूण तालुक्यातील दुसऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर ही कारवाई झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे आणि अंमलदार उदय चांदणे, संजय वाघाटे, जनार्दन पवार, आशिष बल्लाळ, श्रेया विचारे, हेमंत राजेश गावकर, समिता क्षिरसागर व अजिंक्य पवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन:

कोणत्याही शासकीय कामासाठी, दाखल्यासाठी किंवा नोंदीसाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर अथवा ७०३८३९१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.