आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश; स्व. अजितदादांनी दिलेला शब्द महायुती सरकारने पाळला
चिपळूण: Vijayrao Gujar Appointed to District Planning Committee संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शेखर निकम यांचे विश्वासू सहकारी आणि माजी सभापती विजयराव गुजर यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर (DPC) ‘विशेष निमंत्रित सदस्य’ म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चिपळूण तालुक्यातून या समितीवर निवड झालेले ते एकमेव सदस्य असून, त्यांची ‘खासबाब’ म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश
दीर्घकाळापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या विजयराव गुजर यांना जिल्हा नियोजन समितीवर संधी मिळावी, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सतत पाठपुरावा केला होता. स्व. अजितदादा पवार यांनी आमदार निकम यांना या नियुक्तीबाबत शब्द दिला होता. स्व. अजितदादांच्या निधनानंतरही महायुती सरकारने दिलेला शब्द पाळत ही निवड केली आहे.
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचे विशेष लक्ष
या निवडीसाठी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सातत्याने विषय लावून धरला होता. ‘स्व. अजितदादांनी दिलेला शब्द पूर्ण झालाच पाहिजे’ या भूमिकेतून सर्वच वरिष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष घालून गुजर यांना ही संधी दिली.
चिपळूण तालुक्याला मिळाले प्रतिनिधित्व
यावेळी जिल्हा नियोजन समितीमध्ये चिपळूण तालुक्याला थेट प्रतिनिधित्व मिळालेले नव्हते. मात्र, आमदार निकम यांच्या प्रयत्नांमुळे चिपळूणला पुन्हा एकदा महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे. आपल्या निष्ठावंत आणि अभ्यासू सहकाऱ्याला जिल्हा नियोजन समितीवर संधी मिळाल्यामुळे चिपळूण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व महायुतीच्या कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त केला जात असून, विजयराव गुजर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:09 02-09-2026














