५०० मीटर ते १० किमी अंतराच्या स्पर्धेत खेळाडूंची चमकदार कामगिरी; विशाल भोसले व विवेक विलणकर प्रथम
रत्नागिरी : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील पाझर तलावात पार पडलेल्या राज्यस्तरीय ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धेत ‘रत्नागिरी ओपन वॉटर क्लब’च्या जलतरणपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत रत्नागिरीचा डंका वाजवला आहे. ५०० मीटर ते १० किलोमीटर अशा विविध अंतराच्या व विविध वयोगटांच्या श्रेणींमध्ये पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्र तसेच परराज्यातून शेकडो जलतरणपटू सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी ओपन वॉटर क्लबच्या स्पर्धकांनी उल्लेखनीय वेळ नोंदवत अनेक पदकांवर स्वतःचे नाव कोरले.
विशाल भोसले आणि प्रशिक्षक विवेक विलणकर यांनी पटकावले सुवर्णपदक :
स्पर्धेतील सर्वात आव्हानात्मक मानल्या गेलेल्या ५ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रत्नागिरी ओपन वॉटर क्लबच्या विशाल भोसले यांनी केवळ १ तास ४८ मिनिटांत अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच २९ ते ४५ वयोगटातील २ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत स्वतः मुख्य प्रशिक्षक विवेक विलणकर यांनी केवळ ३२ मिनिटांत शर्यत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण कामगिरी केली.

२ किलोमीटर आणि ३ किलोमीटर गटातही पदकांची कमाई :
२ किलोमीटर अंतराच्या १६ ते २९ वयोगटात यश देवदास यांनी चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला, तर याच वयोगटात राज राऊत यांनी तृतीय क्रमांकाचे पदक पटकावले. ३ किलोमीटरच्या अंतरामध्ये रुद्र शेटे यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवत द्वितीय क्रमांक मिळवला, तर श्रीयांश वाघाटे यांनी तृतीय क्रमांकावर बाजी मारली. याशिवाय ५०० मीटरच्या अंतरामध्ये श्रीशा शिंगाडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
दीर्घ अंतराची शर्यत यशस्वीपणे पूर्ण :
पदकांसोबतच अनेक स्पर्धकांनी अतिशय कमी वेळेत आपले उद्दिष्ट गाठत ही कठीण शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली. यामध्ये ३ किलोमीटर अंतराची शर्यत रितेश नाचणकर यांनी यशस्वीरीत्या पूर्ण करून वाहवा मिळवली.
लहान गटातील बाल जलतरणपटूंचीही यशस्वी भरारी :
५०० मीटर अंतराच्या शर्यतीमध्ये वेदांत पावसकर, राज्ञी साळवी, ट्रिया विलणकर, कृष्णल गंधारे, अनाहत कुलकर्णी, क्रिशा गंधारे आणि श्लोक राय या नवोदित जलतरणपटूंनी अत्यंत कमी वेळेत आपले अंतर यशस्वीपणे पूर्ण केले. या सर्व स्पर्धकांच्या धाडसाचे आणि कौशल्याचे क्रीडाप्रेमींकडून विशेष कौतुक करण्यात आले.
प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे मार्गदर्शन :
या सर्व यशस्वी स्पर्धकांना रत्नागिरी ओपन वॉटर क्लबचे मुख्य प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कागलच्या पाझर तलावात मिळवलेल्या या नेत्रदीपक यशामुळे रत्नागिरीतील जलतरण क्षेत्रातून सर्व विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













