Sanjay Raut Pune News: “स्पर्धा परीक्षेचे पेपर फोडणारे केंद्र सरकार; प्रत्येक जिल्ह्यात जंतर-मंतर उभारू”; संजय राऊत यांचा इशारा

Sanjay Raut Pune News: "स्पर्धा परीक्षेचे पेपर फोडणारे केंद्र सरकार; प्रत्येक जिल्ह्यात जंतर-मंतर उभारू"; संजय राऊत यांचा इशारा

पुण्यात रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी संजय राऊत यांची भेट; MPSC विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून महायुती सरकारवर घणाघाती हल्ला

*पुणे :* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘आम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्या’, मग इथं मुलं रस्त्यावर का बसली आहेत? असा सवाल उपस्थित करत, “महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दिल्लीतील जंतर-मंतरसारखे आंदोलन उभे राहिले, तर मंत्र्यांच्या गाड्या मंत्रालयाबाहेर, वर्षा बंगल्याबाहेर आणि मंत्र्यांच्या निवासाबाहेर पडणार नाहीत,” असा आक्रमक इशारा शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.

*”आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न”*
एमपीएससी आयोगाच्या पारदर्शक कारभारावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणाची मागणी महाराष्ट्रभरातून होत आहे. परंतु, जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार पवित्र व शुद्ध पद्धतीने निवडणुका घेऊ शकत नाही, ते पारदर्शक पद्धतीने स्पर्धा परीक्षा काय घेणार?” असा सवाल त्यांनी केला. सरकार आंदोलकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप करत, सरकारचे मन साफ असते तर त्यांनी रोहित पवार आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला असता, असे ते म्हणाले.

Gadre2

*”प्रशासकीय पिढी बरबाद करण्याचे पाप थांबवा”*
महाराष्ट्राचे संपूर्ण प्रशासन हे लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून येणाऱ्या अधिकाऱ्यांवर अवलंबून असते. “तुम्ही या राज्याच्या प्रशासनाला दिशा देणाऱ्या तरुण पिढीलाच बरबाद करायला निघाला आहात, हे पाप कुठे फेडाल?” असा संतप्त सवाल राऊत यांनी विचारला. तसेच केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधत, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कायम राहिल्यास भविष्यात कोणतीही चुकीची व्यक्ती पदावर बसू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*”अंधभक्त बनवण्याचा कारखाना चालवलाय”*
स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि नोकरभरतीतील घोटाळ्यांवर जोरदार टीका करताना खासदार राऊत म्हणाले, “आपल्या टोळ्यांमधील माणसे प्रशासनात घुसवायची, अख्खे राज्य माफियांच्या हातात द्यायचे आणि तरुणांना शिक्षणापासून दूर ठेवून ‘अंधभक्त’ बनवण्याचा कारखाना या सरकारने चालवला आहे. या अंधभक्तीचा गांजा आणि चरस उतरवण्याचे काम आता आम्ही सर्वांनी सुरू केले आहे.”