लोखंडी पाईप व लाथा-बुक्क्यांनी मारहाण, परस्परविरोधी तक्रारी दाखल
Sangameshwar Clash News च्या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आरवली गुरववाडी येथे घरामधील तुळशी विवाहाचा धार्मिक सोहळा सुरू असतानाच सामाईक जमिनीच्या जुन्या वादातून दोन नातेवाईक गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. लोखंडी पाईपने मारहाण, थप्पड-बुक्क्यांचा मार आणि शिवीगाळ झाल्याच्या परस्परविरोधी तक्रारी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून, याप्रकरणी एका गटातील १४ तर दुसऱ्या गटातील २९ अशा एकूण ४३ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांतील व्यक्ती नातेवाईक असून त्यांच्यात सामाईक जमीन-जागेवरून दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. हा वाद न्यायप्रविष्ट असतानाच २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही गट आमनेसामने आले आणि वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.
Sangameshwar Clash News: पहिल्या गटाची तक्रार आणि १४ जणांवर गुन्हा
पहिल्या घटनेत सागर अनंत गुरव (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते घरासमोरील तुळशी वृंदावनात विवाहाची तयारी करत असताना विरोधी गटातील १४ जणांनी बेकायदेशीर जमाव करून कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. फिर्यादी आणि उपस्थितांशी बाचाबाची सुरू झाली; तुळशी विवाहाचा कार्यक्रम पार पडू द्या, त्यानंतर चर्चा करू, अशी विनंती करूनही वाद चिघळल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यावेळी एका संशयिताने महिलांबाबत आक्षेपार्ह शिवीगाळ केली, त्यानंतर आरोपी क्रमांक २ व ४ यांनी लोखंडी पाईपने फिर्यादीच्या पाठीवर मारहाण केली. संतोष गणपत गुरव आणि रोशन गजानन गुरव यांच्या गालावर, तर संदीप तुकाराम गुरव यांच्या नाकावर मारहाण करण्यात आल्याचे म्हटले असून, अन्य आरोपींनीही धक्काबुक्की, मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेत संदीप तुकाराम गुरव (वय ३७) आणि रोशन गजानन गुरव (वय २८) जखमी झाले; अनिकेत सुभाष गुरव याच्यासह १४ जणांविरोधात २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाची स्वतंत्र तक्रार आणि २९ जणांविरोधात नोंद
या घटनेच्या अनुषंगाने दुसऱ्या गटाकडूनही स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुभाष जयसिंग गुरव (वय ५३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मूळ घराच्या ठिकाणी पूजा आणि धार्मिक कार्यक्रमासाठी कुटुंबीय एकत्र जमले होते.
तुळशी विवाह सुरू असताना विरोधी गटातील व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव करून तिथे प्रवेश केला व शिवीगाळ आणि वादावादी सुरू झाली. या वादातील प्रमुख बाबी व कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
मारहाण व जखमी: आरोपी क्रमांक १ व २ यांनी स्वप्नील जयसिंग गुरव यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली, तर अन्य आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलासह कुटुंबियांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप असून या घटनेत स्वप्नील जयसिंग गुरव (वय ४०) आणि शैलेश जयसिंग गुरव (वय ३८) जखमी झाले.
गुन्हा नोंद व तपास: अनंत गुरव याच्यासह २९ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री गुन्ह्याची नोंद झाली असून संगमेश्वर पोलीस पुढील तपास करत आहेत.













