डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेस आक्रमक; ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा इशारा
Congress Silent Rally Ratnagiri: भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने सोमवारी रत्नागिरीत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली. ‘एसआयआर’ प्रक्रियेमुळे मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित केले जात असल्याचा दावा करत काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा अथवा त्यांना पदावरून बडतर्फ करावे, तसेच ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Congress Silent Rally Ratnagiri: मूकमोर्चात प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरू झालेल्या या मूकमोर्चात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर, सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जमीर खलिफे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन शांततापूर्ण मार्गाने कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न; राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करताना सांगितले, “निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असली तरी सध्या तिच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. एसआयआरच्या नावाखाली गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर त्यांच्या सहकाऱ्यांकडूनही आक्षेप नोंदविले गेले आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.” काँग्रेस नेते राहुल गांधी या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठवत असल्याचे सांगत हे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवून मुख्य निवडणूक आयुक्तांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे कीर यांनी नमूद केले.
‘लोकशाही बचाव आंदोलना’अंतर्गत आक्रमक पवित्रा; तीव्र आंदोलनाचा इशारा
माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी हा मोर्चा काँग्रेसच्या २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान सुरू असलेल्या ‘लोकशाही बचाव आंदोलना’चा भाग असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील मतदारांना मतदानापासून वंचित करणारी ठरत असल्याचा आरोप असलेली एसआयआर प्रक्रिया तातडीने रद्द करावी आणि या प्रक्रियेस जबाबदार असलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी ईव्हीएमऐवजी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, असेही काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 06-10-2026














