नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची कारवाई; महालक्ष्मी हॉटेलसमोरील रस्त्यावर सुरू होती विक्री
राजापूर : राजापूर शहरातील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीररीत्या मासे विक्री करून घाण व दुर्गंधी पसरवणाऱ्या नाटे परिसरातील ६ महिला विक्रेत्यांवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी ही कारवाई केली असून, सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी नगरपालिका कायद्यासह पोलीस कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
महालक्ष्मी हॉटेलसमोरील रस्त्यावर कारवाई :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर शहरातील शिवाजी पथ ते मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर महालक्ष्मी हॉटेलसमोर काही महिला रस्त्यावर बसून अवैधपणे मासे विक्री करत असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. त्यानुसार मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:२० वाजण्याच्या सुमारास नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि सफाई कर्मचारी प्रत्यक्ष कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाले.

कचरा व घाण पाणी टाकून पसरवली दुर्गंधी :
पथकाने पाहणी केली असता, संबंधित महिला भररस्त्यात बसून मासे विक्री करत होत्या. तसेच माशांची खवले, टाकाऊ अवशेष आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर फेकून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.
६ महिला विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा नोंद :
याप्रकरणी राजापूर नगर परिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव (वय ५५ वर्षे, रा. धोपेश्वर पन्हळे, राजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ७:२९ वाजता १) सादिका फणसोपकर, २) शाहिन फणसोपकर, ३) अक्सा समिर सोलकर, ४) नाजिया वाडकर, ५) अनिसा रशिद सोलकर आणि ६) सुमय्या बोरकर (सर्व रा. नाटे, ता. राजापूर) यांच्याविरुद्ध गु.र.नं. २६५/२०२६, महाराष्ट्र नगरपालीका अधिनियम १९६५ चे कलम २६७, २६९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.













