Ratnagiri Educational Hub Vision: रत्नागिरीला भव्य शैक्षणिक हब बनवणार; केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव आणि टिळक विद्यालयाच्या पुनर्बांधणीचे दिमाखात लोकार्पण

नाचणे येथे केंद्रीय विद्यालयाच्या इमारतीसाठी ४० कोटींचा निधी मंजूर; ना. उदय सामंत यांची माहिती

Ratnagiri Educational Hub Vision अंतर्गत रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. लोकमान्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत केंद्रीय विद्यालयाचा प्रवेश सोहळा आणि ऐतिहासिक टिळक विद्यालयाच्या पुनर्बांधणीचे लोकार्पण एकत्र होत आहे. रत्नागिरीसारख्या लहान शहरात केंद्रीय विद्यालय होऊ शकत नाही, अशी टीका करणाऱ्यांना प्रत्यक्ष काम पूर्ण करून उत्तर दिले असून रत्नागिरीला भव्य ‘शैक्षणिक हब’ बनवण्याचा निर्धार उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

Ratnagiri Educational Hub Vision: केंद्रीय विद्यालयासाठी ४० कोटींचा निधी मंजूर
शहरातील लोकमान्य टिळक नगरपरिषद शाळा क्र. २ येथे आयोजित संयुक्त सोहळ्यात डॉ. सामंत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात यंदा मंजूर झालेल्या अवघ्या तीन केंद्रीय विद्यालयांपैकी एक आपल्या रत्नागिरीला मिळाले आहे. सध्या टिळक विद्यालयाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात शाळा सुरू झाली असली तरी नाचणे येथील कायमस्वरूपी इमारतीसाठी केंद्र सरकारने तब्बल ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे बांधकाम लवकरच सुरू होत आहे. केंद्रीय विद्यालयात मातृभाषेला प्राधान्य देत मराठी भाषा शिकवली जाईल, असा निर्णय विद्यालयाने घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

रत्नागिरी बनतोय ‘एज्युकेशन हब’ आणि ५० हजार कोटींची गुंतवणूक
आपल्या राजकीय प्रवासाची आठवण सांगताना डॉ. सामंत म्हणाले, २००४ मध्ये आमदार झाल्यापासून स्वतःची एकही खासगी शिक्षण संस्था किंवा कॉलेज उभारले नाही; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, बीएससी नर्सिंग, विधी महाविद्यालय, मरीन इंजिनिअरिंग आणि टाटांचे कौशल्य विकास केंद्र यांसारख्या दर्जाच्या सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी रत्नागिरीत आणल्या. शैक्षणिक विकासासोबतच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर देत, ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या माध्यमातून कोकणासाठी ५० हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक येत असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींची कवाडे खुली: खासदार सुनील तटकरे
केन्द्रीय विद्यालयामुळे कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि प्रगत युगाला साजेसे शिक्षण घेण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे, असे शुभेच्छा संदेशात खासदार सुनील तटकरे यांनी नमूद केले. गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षांमध्ये ‘कोकण पॅटर्न’ने संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे, असा गौरवही त्यांनी केला.

Shanti real estate 1

नगरपरिषद व प्रशासनाची भूमिका
इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना सुरुवात झाली असून, सुमारे १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घेतला आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिली. तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यामध्ये पालकांनी दररोज मोबाईल बाजूला ठेवून किमान एक ते दोन तास आपल्या मुलांना दिले पाहिजेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. या सोहळ्याला जि. प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, केंद्रीय विद्यालयाचे सहायक आयुक्त के. शंकेरय्या, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 08-10-2026