गाडीतील ४ प्रवासी प्रसंगावधानामुळे सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला; कार जळून खाक
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातून पावसच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आज रात्रीच्या सुमारास एका धावत्या चारचाकी कारने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली. भाट्ये परिसरातील झरी विनायक रस्त्यावर ही दुर्घटना घडली असून, आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण कार काही क्षणांतच जळून खाक झाली आहे. सुदैवाने गाडीतील प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली.
प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने वाचले प्राण :
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ‘फोक्सवॅगन’ (Volkswagen) कंपनीची कार (क्रमांक : MH 08 R 8588) रत्नागिरीहून पावसच्या दिशेने जात असताना झरी विनायकजवळ पोहोचताच गाडीतून अचानक धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. गाडीत चार प्रवासी प्रवास करत होते. मात्र, गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तत्परता दाखवत गाडी बाजूला घेतली आणि सर्व प्रवासी तात्काळ गाडीतून बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने चौघेही सुखरूप बचावले असून मोठा अनर्थ टळला.

गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी; मोठे नुकसान :
आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच संपूर्ण कार आगीच्या विळख्यात सापडली. या आगीत गाडीचे अतोनात नुकसान झाले असून कारचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. घटनेची माहिती मिळताच रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती, तसेच स्थानिक नागरिक व मदतकार्य यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.













