सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सुधारित वेळापत्रक जाहीर; बीएलओकडे गणना प्रपत्र जमा करण्याचे आवाहन
Voter List मधून अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (एएसडीडी) प्रवर्गामुळे नावे वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांना नावनोंदणीची आणखी एक संधी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. या मतदारांनी आपले गणना प्रपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) जमा करावे, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) २०२६ राबवला जात आहे. या अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. या यादीतून एएसडीडी प्रवर्गामुळे नावे वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करता यावे, यासाठी आयोगाने १७ नोव्हेंबरच्या पत्रान्वये सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
मतदारांना गणना प्रपत्र भरून देणे सोयीचे व्हावे, यासाठी २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर ही विशेष शिबिरे होणार आहेत. शिबिरांना सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी संबंधित केंद्रांवर उपस्थित राहावे, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Voter List पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकातील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:
गणना प्रपत्रे वितरण व संकलन: १८ ते ३० नोव्हेंबर २०२६
विशेष नोंदणी शिबिरे: २८ व २९ नोव्हेंबर २०२६ (सर्व मतदान केंद्रांवर)
गणना प्रपत्रे निकाली काढणे: १० डिसेंबर २०२६ पर्यंत













