Ratnagiri ST Bus सेवेमुळे तुळजापूर, महालक्ष्मी व सप्तशृंगी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास होणार सुखकर
रत्नागिरी:
Ratnagiri ST Bus सेवेच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात श्री तुळजाभवानी मातेच्या व विविध शक्तीपीठांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाच्या वतीने तब्बल १०० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ११ ते २७ ऑक्टोबर दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील ९ आगारांतून या विशेष गाड्या विविध महत्त्वाच्या धार्मिक मार्गांवर धावणार आहेत.
घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नवरात्रोत्सवाच्या काळात श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे, तसेच श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूर, सप्तशृंगी देवीसाठी व अक्कलकोट, सोलापूर या ठिकाणी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक जात असतात. कोकणातूनही तुळजापूर आणि इतर धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. भाविकांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने ही विशेष सेवा उपलब्ध करून दिली आहे.

९ तालुक्यांतील आगारांतून दररोज सुटणार लालपरी आणि नव्या बसेस
रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ९ आगारांतून या बसेस सोडल्या जाणार आहेत. या प्रवासासाठी साध्या बसेस (लालपरी) सोबतच नव्या स्मार्ट बसेस आणि जिजाऊ बसेस देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. नव्या गाड्यांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात भाविकांना अधिक आरामदायी आणि विनाअडथळा प्रवास करता येणार आहे.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत; ४५ महिलांच्या ग्रुप बुकिंगसाठी विशेष सोय
या विशेष प्रवासादरम्यान महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नियमानुसार तिकिटात सवलत मिळणार आहे. याशिवाय, ज्या ठिकाणी ४५ महिलांचा ग्रुप एकत्र बुकिंग करेल, त्यांच्यासाठी जिल्ह्यातील ९ ही आगारांतून थेट बस उपलब्ध करून देण्याची उत्तम सोय एसटी प्रशासनाने केली आहे. यामुळे महिला भाविकांना एकत्र प्रवास करणे अधिक सोयीचे ठरणार आहे.
नवरात्रोत्सवातील भाविकांची संभाव्य गर्दी, प्रवाशांची गैरसोय टाळणे आणि प्रत्येकाला सुरक्षित वाहतूक व्यवस्था मिळणे या हेतूने रत्नागिरी विभागाने केलेले हे नियोजन प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक ठरेल.













