Majha Gav Arogya Sampanna Gav: रत्नागिरी जिल्हा परिषदेत माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Majha Gav Arogya Sampanna Gav: रत्नागिरी जिल्हा परिषदेत माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

गावपातळीवर आरोग्य जनजागृती आणि प्रशासकीय समन्वय बळकट करण्यावर भर

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या प्रभावी व यशस्वी अंमलबजावणीसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य उंचावणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आणि स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य विभाग यांच्यात सुयोग्य समन्वय साधण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
या कार्यशाळेला जिल्हा परिषद व पंचायत समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समितीचे सभापती नंदकुमार मुरकर, पंचायत समितीचे उपसभापती गजानन धनावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे आणि गटविकास अधिकारी चेतन शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय लोकप्रतिनिधींच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी, वैभव पाटील, महेंद्र झापडेकर, श्रीमती हर्षदा गावडे, श्रीमती श्रद्धा मोरे तसेच पंचायत समिती सदस्य श्रीमती कांचन नागवेकर, श्रीमती पूर्वा दुर्गवळी, श्रीमती साक्षी कुमठेकर, श्रीमती स्वाती शिंदे, दादा दळी, स्वप्नील मयेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे हेदेखील बैठकीस उपस्थित होते.

Arihant 2

आरोग्य तपासणी व प्रतिबंधात्मक सेवांवर विशेष भर
अभियानाच्या यशस्वीतेसाठी आयोजित या कार्यशाळेत तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावपातळीवर नियमित आरोग्य तपासणी, आजारांचा अटकाव करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवणे आणि आरोग्य यंत्रणा अधिक तत्पर ठेवणे याविषयी कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्यातील परस्पर सहकार्यामुळेच हे अभियान तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.