एमटीडीसीच्या संयुक्त भागीदारीतून सविस्तर प्रस्ताव महिन्याभरात सादर करण्याचे आदेश; कोकणातील चित्रपट निर्मिती अन् पर्यटनाला मिळणार मोठी चालना
मुंबई / रत्नागिरी:
Guhagar Film Tourism Project: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत येथील शासकीय भूखंडावर चित्रपट आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) संयुक्त भागीदारीत सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. १३ ऑक्टोबर रोजी मंत्रालयातील त्यांच्या दालनात आयोजित विशेष बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. या प्रकल्पासाठी चित्रपट पर्यटन योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून घेण्यासाठी ‘म्हाडा’ची (MHADA) मदत घेण्याबाबत विचार करावा आणि संपूर्ण प्रस्ताव एका महिन्याच्या आत सादर करावा, असेही मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.
पालशेत येथील १२५ एकर जागेवर पायाभूत सुविधा उभारणार
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मौजे पालशेतसह परिसरातील शासकीय जागांचा वापर करून चित्रपट निर्मितीसाठी योजना तयार करण्याबाबत मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मौजे पालशेत येथे पर्यटन विभागाची सुमारे १२५ एकर शासकीय जागा उपलब्ध आहे. या जागेवर पर्यटन आणि चित्रपट उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अद्ययावत पायाभूत सुविधा विकसित केल्यास कोकणात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी बैठकीत शासनाच्या निदर्शनास आणून दिले.
‘एक खिडकी’ सुविधेमुळे चित्रपट चित्रीकरणातील अडचणी दूर होणार
गुहागर आणि दापोली तालुक्यांतील निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे चित्रपट चित्रीकरणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या परिसरात आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांचे यशस्वी चित्रीकरण झाले आहे. मात्र, चित्रीकरणासाठी आवश्यक परवानग्या आणि सुविधा वेळेत उपलब्ध होण्यात निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर चित्रीकरणासाठी सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्यास चित्रपट निर्मितीला गती मिळण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असा विश्वास डॉ. नातू यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (PPP) विकासावर भर
गुहागर तालुक्यातील पालशेत, वेळणेश्वर आणि तवसाळ येथील शासकीय जागांचा उपयोग करून चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा विकसित करण्याची सूचना बैठकीत मांडण्यात आली. या जागांवर सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (PPP Model) माध्यमातून चित्रपट निर्मितीसाठी सुविधा उभारण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. एमटीडीसीसोबत संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून फिल्मसिटी उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करून निधी उपलब्धतेचे विविध पर्याय तपासण्याचे आदेश सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी दिले आहेत.
उच्चस्तरीय बैठकीस प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीस माजी आमदार डॉ. विनय नातू दूरदृश्य प्रणालीद्वारे (Video Conferencing) सहभागी झाले होते. याशिवाय सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, एमटीडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.













