बदलती जीवनशैली, मानसिक आरोग्य आणि स्क्रीनटाईम विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; १९ ऑक्टोबरपर्यंत रंगणार व्याख्यानांची मालिका
रत्नागिरी :
Ratnagiri Health Awareness Drive: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या विशेष समन्वयाने राज्यभरात ‘जागर आरोग्याचा-मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये जनजागृती व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून १३ ऑक्टोबर रोजी या उपक्रमाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
आरोग्य तज्ज्ञ आणि जिल्हा प्रशासनाचा संयुक्त उपक्रम
या विशेष मोहिमेअंतर्गत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, जिल्हा आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये थेट संवाद साधला जात आहे. या व्याख्यानांमधून प्रामुख्याने तरुणांचे आरोग्य, बदलती जीवनशैली, संतुलित व निरोगी आहाराच्या सवयी, नियमित व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती यांवर मार्गदर्शन केले जात आहे. यासोबतच आजच्या तरुण पिढीपुढील मानसिक आरोग्य, मोबाइल व सोशल मीडियामुळे वाढणारा अति-स्क्रीनटाईम आणि व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम यांसारख्या गंभीर विषयांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
१४ ते १९ ऑक्टोबर दरम्यान महाविद्यालयांमधील व्याख्यानांचे वेळापत्रक
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

१४ ऑक्टोबर: लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय पॉलिटेक्निक आणि शासकीय फार्मसी महाविद्यालय, रत्नागिरी.
१५ ऑक्टोबर: शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी.
१७ ऑक्टोबर: गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी, फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी, शासकीय ITI (मुलांचे व मुलींचे) रत्नागिरी, फिशरीज महाविद्यालय रत्नागिरी, तसेच महर्षि कर्वे स्त्री-शिक्षण संस्था शिरगाव, रत्नागिरी.
१९ ऑक्टोबर: नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी.
आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधण्याचे आवाहन
जिल्ह्यातील अन्य सर्व महाविद्यालये आणि वरिष्ठ शैक्षणिक संस्थांनी आपल्या जवळच्या स्थानिक आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या उपक्रमाविषयी काही अडचणी असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी सुमित सावंत व समाजसेवा अधीक्षक केदार ढेकणे यांच्याशी ८८३०१४७२९५ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.













