Ratnagiri Power Demand News: रत्नागिरी जिल्ह्यात विजेची मागणी २० मेगावॉटने वाढली; ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे १८० मेगावॉटवर पोहोचला वापर

Ratnagiri Power Demand News: रत्नागिरी जिल्ह्यात विजेची मागणी २० मेगावॉटने वाढली; ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे १८० मेगावॉटवर पोहोचला वापर

महावितरणची ३८ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी प्रलंबित; सुरळीत वीज पुरवठ्यासाठी वीजबिल भरण्याचे अधीक्षक अभियंत्यांचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात जाणवू लागलेल्या तीव्र ‘ऑक्टोबर हिट’चा थेट परिणाम महावितरणच्या वीज पुरवठा व मागणीवर झाला आहे. तीव्र उकाड्यामुळे घरोघरी पंखे, एअर कंडिशनर (AC) आणि कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे एरवी नियमित असणारी १६० मेगावॉट विजेची मागणी तब्बल २० मेगावॉटने वाढून थेट १८० मेगावॉटवर पोहोचली आहे. विजेच्या मागणीत अचानक झालेल्या या वाढीसोबतच जिल्ह्यात महावितरणची सुमारे ३८ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

उकाड्याने अंगाची लाहीलाही; वीज निर्मिती व मागणीत तफावत

ऑक्टोबर हिटमुळे रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेचा पारा सुमारे ३४ ते ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दिवसभर उन्हाच्या चटक्याने अंगाची लाहीलाही होत असून, त्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अधिकृतपणे कोणतेही भारनियमन लागू करण्यात आलेले नाही. मात्र, केवळ रत्नागिरीतच नव्हे, तर संपूर्ण राज्यातच अपेक्षापेक्षा जास्त प्रमाणात विजेची मागणी वाढली आहे. यामुळे वीज निर्मिती आणि मागणी यात तफावत निर्माण होऊन काही वेळा तात्पुरत्या स्वरूपात विद्युत पुरवठा खंडित करावा लागत आहे. ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे तांत्रिक पथक सातत्याने कार्यरत आहे.

Amey jwelrs

दिवसापेक्षा रात्री विजेच्या मागणीत अधिक वाढ

जिल्ह्यात दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी विजेची मागणी अधिक वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी सोलर सिस्टीम बसवलेली असते. त्यातही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरल्यास महावितरणकडून काही प्रमाणात वीज दरात सवलतही मिळते. त्यामुळे दिवसा इस्त्री किंवा घरातील पाण्याच्या पंप अशा वस्तूंचा वापर करावा, असे सुचवण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी उष्णता आणि गर्मी वाढत असल्याने पंखे, एसी व कुलरचा वापर अधिक होतो, ज्यामुळे रात्रीच्या वेळी विजेची मागणी झपाट्याने वाढल्याचे दिसून येत आहे.

३८ कोटी रुपयांची महावितरणची थकबाकी प्रलंबित

रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणची दरमहा एकूण वीजबिल मागणी सुमारे १४० कोटी रुपयांची असते. परंतु, विविध वर्गवारीतील ग्राहकांकडून ३८ कोटी रुपयांची थकबाकी अजूनही येणे बाकी आहे. यामध्ये खालीलप्रमाणे थकबाकीची आकडेवारी आहे:

रस्त्यांवरील दिवे (स्ट्रीट लाईट्स): रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या तालुक्यांमधील रस्त्यांवरील दिव्यांची थकबाकी तब्बल ७ कोटी ३९ लाख रुपये आहे.

सार्वजनिक पाणी पुरवठा योजना: विविध सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांची ४ कोटी २१ लाख रुपयांची थकबाकी आहे.

शासकीय कार्यालये व संस्था: जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये आणि संस्थांकडील प्रशासकीय थकबाकीचा आकडा ५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
थकबाकी तात्काळ भरण्याचे महावितरणचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यात सर्व प्रकारचे मिळून एकूण ६ लाख १० हजार ग्राहक आहेत. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणच्या महसुलावर मोठा ताण येत असून, वीज पुरवठा अखंडित व सुरळीत ठेवण्यासाठी सर्व ग्राहकांनी थकीत वीजबिलांचा भरणा त्वरित करावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाच्या वतीने अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.