Dapoli Encroachment Drive News: दापोलीतील खोके हटाव मोहीम अर्ध्यावरच? नगरपंचायतीची भूमिका बदलल्याने टप्प्याटप्प्याने कारवाईचा सूर

Dapoli Encroachment Drive News: दापोलीतील खोके हटाव मोहीम अर्ध्यावरच? नगरपंचायतीची भूमिका बदलल्याने टप्प्याटप्प्याने कारवाईचा सूर

५ ऑक्टोबरच्या आक्रमक कारवाईनंतर नगरपंचायतीची नरमाईची भूमिका; नागरिकांमधून प्रश्न उपस्थित

*दापोली : *दापोली शहरातील बेकायदेशीर खोके आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी दापोली नगरपंचायतीने सुरू केलेल्या धडक मोहिमेचा वेग आता अचानक मंदावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ५ ऑक्टोबर रोजी कारवाईदरम्यान अत्यंत आक्रमक झालेली नगरपंचायत आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई करण्याची घेतलेली ठाम भूमिका यांनंतर आता ‘टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाईल’, अशी बदललेली भूमिका समोर आली आहे. त्यामुळे ही खोके हटाव मोहीम अर्ध्यावरच थांबणार का, असा थेट प्रश्न दापोलीकर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पोलिसा गल्लीसह बाजारपेठेतील टपऱ्यांवरील कारवाई प्रलंबित

दापोलीतील बेकायदेशीर खोके आणि टपऱ्यांवर कारवाई करताना नगरपंचायतीने सुरुवातीला अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. शहरात कुठेही असलेले बेकायदेशीर खोके हटवले जातील, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला होता. मात्र, ५ ऑक्टोबरच्या कारवाईनंतर पोलीस गल्लीसह बाजारपेठेतील इतर अनेक टपऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, याबाबत विचारणा केली असता कारवाई निश्चित होईल; मात्र ती नेमकी कधी होईल, हे सध्या सांगता येणार नाही, अशी माहिती नूतन मुख्याधिकारी महेश धुमाळ यांनी दिली आहे.

Arihant 3

"दापोली शहरात जवळपास ९० खोके आणि २४ मटण व चिकन विक्रेत्यांचे खोके हटवण्यात आले आहेत. उर्वरित खोक्यांबाबतही टप्प्याटप्प्याने कारवाई होणार आहे. त्याबाबत योग्य वेळी आपणास सांगू." — महेश धुमाळ, मुख्याधिकारी, दापोली नगरपंचायत

केवळ २५ टक्केच कारवाई पूर्ण; नागरिकांत नाराजी

दापोली शहरात आतापर्यंत झालेली कारवाई ही एकूण आवश्यक कारवाईच्या तुलनेत अंदाजे २५ टक्केच असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित सुमारे ७५ टक्के कारवाई अजूनही बाकी असल्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. नगरपंचायतीने बेकायदेशीर खोके हटवण्याची मोहीम हाती घेतल्याने अनेक अतिक्रमणधारक व्यावसायिकांत सुरुवातीला नाराजी निर्माण झाली होती. मात्र, शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू केल्याबद्दल सामान्य नागरिकांकडून मुख्याधिकारी धुमाळ यांच्या भूमिकेचे कौतुकही झाले होते. असे असताना, आता ही कारवाई अर्ध्यावरच थांबल्याचे चित्र निर्माण झाल्याने नगरपंचायतीच्या बदललेल्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये पुन्हा असंतोष व्यक्त केला जात आहे.

आगामी काळात पुन्हा जेसीबीचा धडाका सुरू होणार?

सुरुवातीला जर कारवाई सरसकट होणार होती, तर आता अचानक टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याची भूमिका का घेतली गेली, असा सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे. बेकायदेशीर खोक्यांपैकी मोठा हिस्सा अद्यापही जैसे थे परिस्थितीत कायम आहे. उर्वरित खोक्यांवर कारवाई करण्याचे नियोजन सुरू असल्याचे नगरपंचायतीकडून सांगितले जात असले, तरी कोणत्याही निश्चित तारखेची घोषणा झालेली नाही. त्यामुळे खोके हटाव मोहिमेला तूर्तास ब्रेक लागला आहे की आगामी काळात पुन्हा एकदा जेसीबीचा धडाका पाहायला मिळणार, याकडे संपूर्ण दापोलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.