जिल्हा नियोजन समिती सभागृहात विशेष जनजागृती कार्यशाळा; प्रक्रिया, दर्जा आणि पॅकेजिंगच्या जोरावर निर्यातीला गती देण्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन
रत्नागिरी:
Ratnagiri EXIM Bank Workshop अंतर्गत कृषी, फलोत्पादन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील उत्पादन वृद्धीसह निर्यातीला गती देण्यासाठी ‘एक्झिम बँक’ (EXIM Bank) आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले की, निसर्गाने रत्नागिरीच्या भूमीला आंबा, काजू, फणस आणि समृद्ध सागरी संपत्तीचे भरभरून वरदान दिले आहे. या स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधुनिक प्रक्रिया, दर्जेदार आंतरराष्ट्रीय पॅकेजिंग आणि योग्य मूल्यवर्धन (Value Addition) केल्यास जिल्ह्यातील स्थानिक शेतकरी व नवउद्योजकांसाठी जागतिक बाजारपेठेची कवाडे सहज खुली होऊ शकतात. मायकल डेल यांच्याप्रमाणे आजच्या युवा पिढीमध्ये शून्यातून मोठे उद्योग साम्राज्य उभे करण्याची उद्योजक वृत्ती निर्माण होणे काळाची गरज आहे.
छोट्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादनांचे प्रमाणीकरण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॅकेजिंग या त्रिसूत्रीच्या आधारे स्थानिक उत्पादने सातासमुद्रापार पोहोचवणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी फणसाच्या वाढत्या जागतिक मागणीचा वेध घेत पावडर, औषधी घटक आणि ‘व्हेगन लेदर’सारख्या नावीन्यपूर्ण उत्पादनांची यशस्वी निर्मिती करणारे ‘फणस किंग’ मिथिलेश देसाई यांच्या कार्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष गौरव केला.

Ratnagiri EXIM Bank Workshop: ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ आणि प्रशासकीय पाठबळ
जिल्ह्यात ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ प्रत्यक्ष कृतीत आणले जात असून, ‘राइट टू सर्व्हिस’ कायदा आणि ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून उद्योगांशी निगडित आवश्यक सर्व दाखले व परवानग्या अवघ्या २० दिवसांत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. एक्झिम बँक व इतर वित्तीय संस्थांच्या सहकार्याने आर्थिक पाठबळ, कर्जसुविधा आणि निर्यात धोरणांचे योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने जिल्ह्यातील तरुणांनी व नवउद्योजकांनी या संधीचे सोने करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त अजिंक्य आजगेकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी शासकीय निर्यात धोरणे आणि उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली.
या कार्यशाळेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, एक्झिम बँकेचे उपमहाव्यवस्थापक रविदास प्यागे, वॉलमार्ट वृद्धीचे अनिष प्रधान, हेमेंद्र म्हात्रे, रुवान फुट टेकचे निनाद पाटील, इंडिया पोस्टचे गजानन करमरकर, जॅकफ्रूट किंग अॅग्रोचे मिथिलेश देसाई यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रगतिशील शेतकरी, प्रक्रियाोजक आणि भावी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













